Bhandara Hospital Fire: 'ह्यांच्या चौकशांना कोणी भीक घालत नाही' म्हणत निलेश राणे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
भंडारा अग्नितांडवात 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेवरुन भाजप नेते निलेश राणे यांची राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णायलयातील (Bhandara District General Hospital) नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी समोर आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रीया उमटत आहेत. दरम्यान, या घटनेची कसून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यावरुन भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ह्यांच्या चौकशांना कोणीही भीक घालत नसल्याचे ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आले त्या नंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही." (Fire at Bhandara District Hospital: भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री विश्वजित कदम, अमित शाह, राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या भावना)
निलेश राणे ट्विट:
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला तर 7 चिमुकल्यांचा जीव वाचवण्यात यश आले. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करत सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले. तसंच घटनेची तात्काळ चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि आरोग्यमंत्र्याशी चर्चा करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मृत बालकांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.