संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे चंगू मंगूच्या फालतू गप्पा; निलेश राणे यांचा शिवसेनेवर निशाणा
या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना खासदार आणि सामानाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
उद्या 27 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना खासदार आणि सामानाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची विशेष मुलाखत घेतली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी टीका केली आहे. 'चंगू मंगूच्या फालतू गप्पा' असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या मुलाखतीचा टीझर संजय राऊत यांनी आज ट्विट केला असून 'उद्या धमाका' असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे. निलेश राणे यांनी यावर टीका करत या मुलाखतीतून आणि व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळणार नसल्याचे म्हटले आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही अशा फुकट्या लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगू च्या फालतू गप्पा." (महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत; पहा टीझर)
निलेश राणे ट्विट:
मागील वर्षी नाट्यमय घडामोडींंनंतर महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. मात्र त्यानंतर हे सरकार फार काळ टिकणार नसल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत होती. अद्यापही ती सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे रावसाहेब दानवे यांनी पुढील तीन महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा केला होता. असे असेल तरी ठाकरे सरकार वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर उभं आहे. मात्र यावेळी देखील निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.
दरम्यान, वर्षपूर्ती निमित्त सरकार वर्षभरातील कामाचा अहवाल सादर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात म्हटलं होतं. त्यामुळे संजय राऊत यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री वर्षपूर्तीचे कामकाज, विरोधकांची टीका यावर नेमकं काय बोलतात? याबद्दल जनतेला उत्सुकता आहे.