Narayan Rane Controversial Statement: नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता; नाशिक पोलिसांचे पथक चिपळूनकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नाशिक (Nashik) येथे गुन्हा दाखल झाला आहे.

Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नाशिक (Nashik) येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूनकडे रवाना झाल्याचे समजते. भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा (an Ashirwad Yatra) सध्या महाराष्ट्रभर सुरु आहे. सध्या ही यात्रा कोकणात सुरु आहे. आज (मंगळवार, 24 ऑगस्ट) चिपळूण (Chiplun) येथून ही यात्रा सुरु होणार आहे. नाशिक पोलिसांचे पथक वेळेत पोहोचले तर चिपळून येथूनच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

रायगड येथील महाड येथे नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली. या यात्रेदरम्यानस सोमवारी (8 ऑगस्ट) बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली. नारायण राणे म्हणाले की, ''त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती''.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या वक्तव्यावरुन नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी हे आक्षेपार्ह विधान केले. दरम्यान, नारायण राणे यांच्यावर पहिला गुन्हा नाशिक येथे दाखल झाला आहे. नाशिक येथील शिवसेना पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, केंद्रीय मंत्री Narayan Rane यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर Shiv Sena आक्रमक)

नारायण राणे यांच्यावर कलम 500, 502, 505,153 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांचे विधान समाजात द्वेश आणि तेढ निर्माण करणारे ठरु शकते. या शिवाय त्यांच्या विधानावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना अटक करताना प्रोटोकॉलचे पालन करावे असे आदेशही पोलिसांना असल्याचे समजते. जर नारायण राणे यांना अटक झाली तर त्याची माहिती उपराष्ट्रपती आणि राज्यसभा उपसभापती व्यंकय्या नायडूंना दिली जाईल. ही माहिती हिंदी अथवा इंग्रजी भाषेत दिली जाईल.