किरीट सोमय्या यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी, चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे विविध संघटनात्मक निर्णय

या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यावर चंद्रकांत पाटील यांनी आज पहिल्यांदा काही संघटनात्मक निर्णय घेऊन काही नेमणुका केल्या आहेत.BJP चे माजी खासदार किरीट सोमैया यांची आज, 19 ऑगस्ट रोजी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

kirit somaiya | (Photo Credit: kiritsomaiya.com)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) आता अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर BJP चे माजी खासदार किरीट सोमैया (kirit Somaiya) यांची आज, 19 ऑगस्ट रोजी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. आज, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोमैया यांच्यसह डॉ. सुभाष भामरे, प्रवीण पोटे पाटील, योगेश गोगावले आणि अशोक कांडलकर यांची सुद्धा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यावर चंद्रकांत पाटील यांनी आज पहिल्यांदा काही संघटनात्मक निर्णय घेऊन या नेमणुका केल्या आहेत. यामध्ये भाजपा, प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची निवड करण्यात आली. याशिवाय, जिल्हाध्यक्ष पदी देखील काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ, पुणे शहर सरचिटणीसपदी गणेश बिडकर, जालना जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे आणि यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नितीन भुतडा यांची वर्णी लागली आहे.

याशिवाय चंद्रकांत पाटील यांनी आज प्रवक्तेपदी देखील अनेकांची नेमणूक केली. यामध्ये भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी तर सह मुख्य प्रवक्ता म्हणून केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मधू चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाठ, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर या सर्वांची प्रवक्ते पदी वर्णी लागली आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली तसेच नव्याने रुजू झालेल्या या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.