Maharashtra Gram Panchayat Election Result 2021: भाजपचे 6000 सरपंच होतील, चंद्रकांत पाटील यांचा दावा
या गावांमध्ये भाजपचा सरपंच होईल अशा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर राज्यात भाजपचे सहा हजार सरपंच होतील असा दावाही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात 14 हजार 164 गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election Result 2021) निम्मे निकाल आज जाहीर झाले आहेत. आज उशिरापर्यंत हे निकाल येणार असून उद्या दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या निकालापैकी 1907 गावांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनल विजयी झाले आहेत. या गावांमध्ये भाजपचा सरपंच होईल अशा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर राज्यात भाजपचे सहा हजार सरपंच होतील असा दावाही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात 1665 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या. यापैकी 564 ग्रामपंचायतींवर भाजपचं पूर्ण पॅनल आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात 629 ग्रामपंचायतींपैकी 348 ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.हेदेखील वाचा- Ralegan Siddhi Gram Panchayat: राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे समर्थकांचा विजय, जीसीबीतून काढली मिरवणूक, पोलीसांनी बंद पाडला डिजे
'आमदार विखे पाटलांच्या मतदारसंघात 25 पैकी 24 जागा भाजपने जिंकल्या आहेत. खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 70 पैकी 50 जागांवर भाजपला यश आलं आहे. इतकंच काय तर शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या इन्कूळ गावात 9 पैकी 6 जागा भाजपने जिंकल्या' असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला. तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकासआघाडीने हेराफेरी केल्याचा घणाघाती आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या तळोदे ग्रामपंचायत भाजपने जिंकली. आदित्य ठाकरे यांच्या जिल्हापरिषद गटातील अंगर भाजपने जिंकली. जयंत पाटील यांची सासुरवाडी म्हैसाळ ग्रामपंचायत जिंकली.कराडमध्ये अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात 52 पैकी 40 गाव जिंकले.नाथाभाऊंच्या गावची ग्रामपंचायतही भाजपच्या ताब्यात आले असून भाजपच्या विजयाची यादी खूप मोठी असे विधानही त्यांनी यावेळी केले.
तसेच उद्या दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर येत्या 2 दिवसांत तुमच्यासमोर मोठी घोषणा करणार असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.