भीमा-कोरेगाव येथील विजयानिमित्त 'भीम आर्मी'ची पुण्यात महासभा; चंद्रशेखर आझाद यांची उपस्थिती
भीमा-कोरेगाव येथील विजयाला 201 वर्षे पूर्ण होणार आहेत, यानिमित्ताने पुण्यात भीम आर्मीच्या वतीने महासभेचे आयोजन करण्यात येणार आहे
भीमा-कोरेगाव येथील विजयाला 201 वर्षे पूर्ण होणार आहेत, यानिमित्ताने पुण्यात भीम आर्मीच्या वतीने महासभेचे आयोजन करण्यात येणार आहे. दलित संघटना भीम आर्मी यांनी बुधवारी ही माहिती दिली असून, या महासभेत संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे उपस्थित जमावाला संबोधित करणार आहेत. 30 डिसेंबर रोजी या ‘भीमा कोरेगाव संघर्ष महासभा’चे आयोजन केले गेले आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत, भिम आर्मीचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एसएसपीएमएस मैदानावर 'भीमा कोरेगाव संघर्ष महासभे'चे आयोजित करण्याची योजना आहे, ज्यामध्ये आझाद यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी आझाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (एसपीपीयू) विद्यार्थ्यांशी ‘संवाद आंबेडकरी’ या विषयांतर्गत आंबेडकरवादी चळवळीच्या परिस्थितीवर संवाद साधतील.
विजय दिन, म्हणजे 1 जानेवारी रोजी आझाद आणि कार्यकर्ते कोरेगाव-भिमा जवळील पेरणे गावातील युद्ध स्मारक-‘जयस्तंभ’ला भेट देत्तील. हा जयस्तंभ जानेवारी 1, 1818 रोजी ब्रिटीशांनी पेशव्यांच्या विरूद्ध झालेल्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारला होता. पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा 1 जानेवारी 1818 रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा 201 वर्ष पूर्ण होणार आहेत.
2014 साली वकील चंद्रशेखर आझाद रावण आणि विनय रतन सिंह यांनी सहारनपुर येथे भीम आर्मी या दलित संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेतर्फे जवळ जवळ 350 शाळेमधील विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षण दिले जाते. गेल्या वर्षी जूनमध्ये हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली होती.