भरत गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री घोषित; शासन निर्णय जारी
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य सरकारने नाशिकसाठी गिरीश महाजन तर रायगडसाठी भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
महायुती सरकारमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. राज्य शासनाने नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan), तर रायगडच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
भरत गोगावले, गिरीश महाजन च्या पदरी पालकमंत्री पदाचं दान
दोन वर्षांहून अधिक काळ रखडलेला निर्णय
रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या सुमारे दोन वर्षांपासून राजकीय रस्सीखेच सुरू होती. रायगड जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या मंत्री आदिती तटकरे यांचा दावा होता, तर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले हेदेखील या पदासाठी आग्रही होते. दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपचा दावा कायम असताना, शिवसेनेकडून ज्येष्ठ मंत्री दादा भुसे यांच्या नावाचा आग्रह धरला जात होता.
या राजकीय तिढ्यामुळे गेल्या स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनीही या दोन्ही जिल्ह्यांना अधिकृत पालकमंत्री नसल्याने, या दोन्ही जिल्ह्यांतील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांच्याकडूनच पार पाडले जात होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर चर्चेतून तोडगा
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. या बैठकीत रायगड जिल्ह्याची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यावर सहमती झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, यापूर्वीच्या प्रजासत्ताक दिनाच्या फॉर्म्युल्यानुसार, रायगडमध्ये गोगावले आणि नाशिकमध्ये महाजन यांनाच ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती, जो फॉर्म्युला अखेर पालकमंत्रिपदाच्या अंतिम नियुक्तीतही कायम ठेवण्यात आला.
रायगडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष विशेष चर्चेचा विषय ठरला होता. सुरुवातीला हे पद राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे होते, मात्र शिवसेनेकडून भरत गोगावले यांच्या नावाचा सातत्याने आग्रह धरला जात होता. काही काळापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली होती, मात्र अंतिम निर्णय होण्यास बराच विलंब झाला.
नाशिकमध्ये भाजप-शिवसेना यांच्यात रस्सीखेच
नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजपचा दावा कायम असताना, शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते दादा भुसे यांना संधी मिळावी यासाठी दबाव वाढवण्यात आला होता. मात्र अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले.
निर्णयाचे राजकीय महत्त्व
रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रिपदाचा प्रश्न मार्गी लागल्याने, महायुतीतील घटक पक्षांमधील एक महत्त्वाचा राजकीय तिढा निकाली निघाला आहे. या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.