BEST Bus Strike: मुंबई मध्ये सहाव्या दिवशीही बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा संप कायम; प्रवाशांचे हाल
मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या कंपन्यांतील कंत्राटी चालक व वाहकांनी संप पुकारल्याने मुंबईतील बेस्टची बस सेवा विस्कळीत झाली आहे.
रेल्वे नंतर मुंबईकरांची पसंती असलेली वाहतूक सेवा म्हणजे बेस्ट बस(BEST Bus) . मात्र आज नव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील बेस्टचा कंत्राटी कामगारांचा संप (BEST Bus Strike) कायम आहे. या संपाचा आज सहावा दिवस आहे. अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नसल्याने बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या कंपन्यांतील कंत्राटी चालक व वाहकांनी संप पुकारल्याने मुंबईतील बेस्टची बस सेवा विस्कळीत झाली आहे.
मुंबई मध्ये नोकरी, काम धंद्याला जाणार्यांना बेस्टच्या बसचा आधार होता. किफायतशीर दरामध्ये प्रवासी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊ शकतात. तसेच शाळकरी मुलांना देखील बेस्ट बसचा आधार होता. परंतू आता सार्यालाच खीळ बसला आहे. बेस्ट प्रशासन किंवा राज्य सरकार कडूनही अद्याप यावर कोणतीही बैठक आयोजित करून चर्चा झालेली नाही. आज यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचं आयोजन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मालाड येथे कंत्राटी कामगारांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. तेथे बेस्ट कडून मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायमस्वरूपी चालक व वाहक भाडेतत्त्वावरील बसेस चालवत असल्याने कंत्राटी कामगार त्यांना रोखून धमकावत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सध्या भाडेतत्त्वावरील 1671 पैकी 704 बस आगारतच उभ्या आहेत. मालवणी आगारात सध्या पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. नक्की वाचा: BEST Bus Strike: घाटकोपर, मुलुंड आगारामध्ये कंत्राटी कर्मचारी संपावर; वाहतूक सेवा विस्कळीत .
कंत्राटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून 150 गाड्या घेऊन त्या चालवल्या जात आहेत.