BEST Bus Pass Rate Hike: बेस्टकडून बसपास योजनेच्या दरांमध्ये वाढ; जाणून घ्या 1 मार्च पासून लागू होणारे नवे दर

बेस्टने ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक बसपासमध्ये ५० रुपयांची सवलत कायम ठेवली आहे.

BEST Bus (File Image)

मुंबईकरांसाठी लोकल नंतर वाहतूकीचा किफायतशीर पर्याय म्हणजे बेस्ट बस (BEST Bus) . सध्या मुंबईकरांच्या सेवेमध्ये एसी, नॉन एसी बस सेवा तसेच इलेक्ट्रिक वर चालणार्‍या बस आहेत. पण आता 1 मार्च पासून बेस्टने पासच्या दरामध्ये वाढ केली आहे. 7 एप्रिल 2023 पासून लागू केलेले दर आता बदलणार आहेत. 1 मार्च 2024 पासून बस पासच्या दरामध्ये वाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे सामान्यांच्या खित्राला नव्या महिन्यापासून कात्री लागणार आहे.

बेस्टच्या सुधारित बसपास योजनेमध्ये 42 ऐवजी 18 बसपास करण्यात आले आहेत. बेस्टचा अमर्याद बस प्रवासासाठी पूर्वी 50 रूपयांचा दैनंदिन पास आता 60 रूपये करण्यात आला आहे. तर मासिक पाससाठी 900 रूपये मोजावे लागणार आहेत.

पहा सविस्तर आणि नवं दरपत्रक

विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 200 रूपयांचा मासिक बसपास उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या बसपासच्या मदतीने अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. या बसपासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

बेस्टचे हे पास ' बेस्ट चलो अ‍ॅप' आणि जारी स्मार्टकार्ड द्वारा देखील वापरता येऊ शकतात. बेस्टने ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक बसपासमध्ये ५० रुपयांची सवलत कायम ठेवली आहे. साप्ताहिक बसपासमध्ये कोणतीही सूट नसेल. बीएमसी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गणवेशधारक विद्यार्थ्यांना तसेच 40 टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बसपासमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.