Acid Attack: प्रेयसीवर अॅसीड ओतून, पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराचे कृत्य; 12 तासांच्या याचनेनंतर पीडितेला मिळाली मदत

त्याने प्रेयसी (सावित्रा) हीस रस्त्याच्या बाजूला नेऊन तिच्यावर अॅसीड फेकले. नंतर तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमा आणि वेदनेने विव्हळत असलेल्या प्रेयसीला जागेवरच सोडून प्रियकाराने पोबारा केला.

Burn Out | Representational Image (Photo Credits: Pixabay)

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या 22 वर्षीय प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) करुन आणि पेट्रोल (Petrol) ओतून रस्त्यातच जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बीड (Beed) तालुक्यातील तालुक्यातील येळंब घाट परिसरात घडली. धक्कादायाक असे की ही घटना घडल्यानंतर हल्लेखोर प्रियकर घटास्थळावरुन पसार झाला. मात्र, पीडित तरुणी तब्बल 12 तास रस्त्यावरच तडफडत होती. प्राप्त माहितीनुसार, पीडिता सावित्रा ( वय 22) आणि आरोपी (अविनाश राजुरे) हे गेल्या काही दिवसांपासून पुणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. दोघेही पुण्याहून गावी निघाले होते. शुक्रवारी (13 नोव्हेंबर 2020) रात्री हे दोघे पुण्याहून गावी जाण्यासाठी बाईकहून निघाले. साधारण पहाटे तीनच्या सुमारास दोघेही आपल्या बाईकवरुन बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात आले.

दरम्यान, बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात असलेल्या मांजरसुंबा-केज या मुख्य रस्त्यावरुन जात असताना आरोपीने पहाटे 3 वाजनेच्या सुमारास गाडी थांबवली. त्याने प्रेयसी (सावित्रा) हीस रस्त्याच्या बाजूला नेऊन तिच्यावर अॅसीड फेकले. नंतर तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमा आणि वेदनेने विव्हळत असलेल्या प्रेयसीला जागेवरच सोडून प्रियकाराने पोबारा केला. (हेही वाचा, पुणे: अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत केला व्हिडिओ शूट, आरोपीला पोलिसांकडून अटक)

दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यालगतच्या खड्ड्यातून विव्हळण्याच आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता अर्धवट अवस्थेत जळालेला पीडितेचे शरीर आढळून आले. नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला खड्ड्यातून बाहेर काढले. तिला बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला आहे. पीडितेचे शरीर 48 टक्के भाजले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.