Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात राम मंदिराच्या साधूला मारहाण; 25 ग्रामस्थांवर FIR दाखल
औरंगाबाद जिल्ह्यात एका साधूला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Aurangabad: महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात एका साधूला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधूवर सुमारे 20 ते 25 ग्रामस्थांनी हल्ला केला. औरंगाबादच्या पैठण तहसीलच्या जांभळी गावात राम मंदिरात गणेश पुरी (शिंदे) नावाचे साधु राहतात. या साधूला ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, साधू त्यांच्या झोपडीतून दोन तलवारी घेऊन गावकऱ्यांच्या दिशेने धावत आहेत. संतप्त झालेला साधू महाराज व्हिडिओमध्ये तुम्ही माझी पालघरच्या साधूप्रमाणेचं हत्या करताल, असं वारंवार म्हणत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये या साधूच्या हातात दोन तलवारी दिसल्या. मात्र, आपल्या संरक्षणासाठी या तलवारी काढल्या असल्याचा दावा साधूने केला आहे. यासंदर्भात आज तक या हिंदी चॅनेलला बोलताना साधू म्हणाले की, "माझ्यावर हल्ला करणारे गावकरी नेहमीचं मला त्रास देतात. यापूर्वीदेखील गावकऱ्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता."
दरम्यान, दुसरीकडे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, शुक्रवारी मोक्षदा एकादशी होती. त्यामुळे मोठ्या संख्येने पुरुष व स्त्रिया निलाज गावातून श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी गावातील एका व्यक्तीची गाय अचानक साधूच्या शेतात गेली. त्यामुळे साधूंनी महिला व ग्रामस्थांवर काठी घेऊन धावले. साधूने एका गावकऱ्यांला काठीने मारहाण केली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थ एकत्र जमले. ग्रामस्थांची गर्दी पाहून साधू त्यांच्या झोपडीत गेले आणि त्यांनी आपल्या संरक्षणासाठी दोन तलवारी घेतल्या. (हेही वाचा - पुणे: महिलांचा वेश धारण करुन चोरट्यांनी फोडली ATM मशिन; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)
साधूने गावकऱ्यांवर दगडफेक केल्याचा आरोपही केला आहे. परंतु, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, साधू आणि गावकऱ्यांमध्ये केवळ वाद झाला. त्यांनी साधूला दगडमार केली नाही. गर्दी पाहून साधू धावत सुटले. कदाचित पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली असावी.
साधू महाराजांवर सध्या औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पासून पोलिस साधूला गुन्हा नोंदवण्यास सांगत होते. परंतु, साधू त्यास तयार नव्हता, अशी माहिती पोलिसांनी आज तकला दिली. शनिवारी रात्री साधूने औरंगाबाद ग्रामीण पोलिसात 20 ते 25 ग्रामस्थांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या साधूकडे दोन तलवारी कोठून आल्या याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी साधूकडून तलवार ताब्यात घेतली आहे. दरम्यान, साधूकडे आढळून आलेल्या तलवारी बेकायदेशीरपणे असल्यास त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाण्याची शकता आहे.