Bandatatya Karadkar Arrested: कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक; सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

Bandatatya Karadkar | (File Image)

कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना सातारा पोलिसांनी अटक केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी सातारा पोलिसांनी बंडातात्या यांना पिपरंद (ता. फलटण) येथील राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना साताऱ्यात आणण्यात आले. पुढे त्यांना अटक (Bandatatya Karadkar Arrested) करण्यात आली. त्यांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर विविध कलमांखाली सातारा शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विनापरवाना आंदोलन करणे, जमाव जमवने आदी गोष्टींचा समावेश आहे. सातारा येथे व्यसनमुक्ती संघटनेने बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात 'दंडवत आणि दंडूका' आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी जमलेल्या जमावापुढे बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात. दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला? राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात. त्यांनी आव्हान दिले तर मी हे सिद्ध करुन दाखवू शकतो, असेही बंडातात्या म्हणाले होते. त्यांच्या विधानामुळे जोरदार वाद निर्माण झाला होता. (हेही वाचा, Bandatatya Karadkar: बंडातात्या करडकर पोलिसांच्या ताब्यात, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याबाबतचे वक्तव्य भोवण्याची शक्यता)

महिला नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया

स्वत:ला किर्तनकार म्हणवतात मात्र स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात- मनिशा कायंदे

बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महिला नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. स्वत:ला किर्तनकार म्हणवतात मात्र दुसऱ्या बाजूला स्त्रीत्वाचे धिंडवडे काढता. त्यांना जाहीरित्या अपमानित करतात. केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी. असली विधाने खपवून घेतली जाणार नाही, असे कायदे यांनी म्हटले आहे. पोलिसांना विनंती करते की त्यांनी बंडातात्यांना जाब विचारावा अशी मागणीही मनिषा कायंदे यांनी केली आहे.

अशा पद्धतीचे वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत- नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांनीही बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. आम्ही राज्य सरकारने घेतलेल्या वाईनच्या निर्णयाला विरोध करतो. आम्ही त्या निर्णयाच्या विरोधातच आहोत. राज्यातील सर्व महिलाही राज्य सरकारच्या या धोरणाच्या विरोधात आहेत. असे असले तरी बंडातात्या कराडकर यांनी महिलांबाबत केलेले अशा पद्धतीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

संबंध महिलांचा अपमान -रुपाली ठोंबरे-पाटील

मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर विधानावर टीका करत म्हटले आहे की, सुप्रिया सुळे या महिलांचे नेतृत्व करतात. त्यांच्यावर आक्षेपार्ह टीका करुन बंडातात्या कराडकर यांनी संबंध महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याबबत माफी मागावी, असेही त्या म्हणाल्या.