Bakrid 2021 Guidelines: बकरी ईद साजरी करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

त्यामुळे यंदाही अनेक सण-उत्सवांवर कोविड-19 चे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष नियम आणि अटींच्या आधारे सणवार साजरे करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

Bakrid 2021 | Representational Image | (Photo Credits: Facebook)

Bakra Eid 2021: मागील वर्षी सुरु झालेले कोरोना व्हायरसचे (Coronavirus) गंभीर संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे यंदाही अनेक सण-उत्सवांवर कोविड-19 (Covid-19) चे सावट कायम आहे. याच पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र विशेष नियम आणि अटींच्या आधारे सणवार साजरे करण्यास सरकारकडून मुभाही देण्यात येते. दरम्यान, 21 जून रोजी असणारी बकरी ईद (Bakrid) साजरी करण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. तसंच यंदाची ईद साधेपणाने साजरी करावी, असेही सांगण्यात आले आहे. येथे पहा Bakrid 2021 Guidelines.

बकरी ईद साजरी करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सूचना:

# कोविड-19 संकटामुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे ईदनिमित्त नमाज मशिद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी घराच्या घरी नमाज पठण करावे.

# जनावरांचे बाजार बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने किंवा दुरध्वनीद्वारे जनावरं खरेदी करावी.

# नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी.

# सध्या लागू असलेल्या निर्बंधामध्ये बकरी ईद निमित्ताने कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही.

# बकरी ईद निमित्त सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

# ईद साजरी करताना लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. दरम्यान, सणाचा प्रत्यक्ष दिवस येईपर्यंत यात काही अधिक सूचनांची भर पडल्यास त्याचेही पालन करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

(हे ही वाचा: Ganeshotsav 2021 Guidelines: घरगुती गणपतीची मूर्ती 2 फूटांची असावी; 'गणेशोत्सवा'साठी राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना)

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस वेरिेएंटचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता सणांच्या सेलिब्रेशनमुळे संसर्गाचे प्रमाण वाढू नये, यामुळेच नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, सण साजरे करताना कोरोनाच्या त्रिसुत्रीचे उल्लंघन होणार नाही, याकडे लक्ष देणे ही नागरिकांची जबाबदारी आहे.