Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर येथे अल्पवयीन शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार, व्हायरल पोस्टनंतर खळबळ

या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) झाल्याची माहिती पुढे आली. ज्यामुळे तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. धक्कादायक म्हणजे, तिच्या शाळेतील एका कर्मचाऱ्यानेच स्वच्छतागृहात तिच्यासोबत लैंगिक गैरवर्तन केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Badlapur Sexual Assault | (Photo Credit - X)

व्यक्ती लहान असो की मोठी, गुप्तांगामध्ये खाज होणे, चणचण करणे ही तशी सामान्यच घटना. खास करुन लहान मुलांमध्ये. पण, तुम्ही पालक असाल आणि तुमचे पाल्य अशी तक्रार करत असेल तर, अजिबात दुर्लक्ष करु नका. त्याकडे तातडीने लक्ष द्या. असाच प्रकारसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

नामांकीत शाळेतील प्रकार

पीडिता ही बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिक्षण घेते. या शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने पीडितेसोबत लैंगिक गैरवर्तन केले. पीडितेने आपल्या आईकडे गुप्तांगामध्ये मुंग्या चावत आहेत, अशी तक्रार केली. गुप्तांगामध्ये सातत्याने असे होण्याचे नेमके कारण काय? याचा विचार करत पीडितेच्या पालकांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तन झाल्याचे निष्पन्न झाले. पालकांनी शाळेकडे तक्रार केली. मात्र, शाळेने कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. अखेर एका वकिलाने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आणि खळबळ उडाली. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या इतर पालकांना याबाबत माहिती मिळताच ते आक्रमक झाले. पालकांनी शाळेबाहेर निदर्शने करत बदलापूर बंदची हाक दिली. पालकांचा एक मोर्चाही शाळेच्या फाटकावर धडकला. दरम्यान, तीन तास उलटून गेले तरी, शाळेच्या वतीने कोणीही पालकांसोबत चर्चा करण्यास पुढे न आल्याने संताप वाढला आहे. एकूण प्रकारात शाळा प्रशासन, पोलीस आणि यंत्रणांची भूमिकाही संशयास्पदच राहिल्याचा आरोप होतो आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपीने दोन मुलींसोबत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

व्हिडिओ

शिवसेना (UBT) पदाधिकाऱ्यामुळे प्रकरणाला फुटली वाचा

शिवसेना (UBT) पदाधिकारी अॅड. जयेश वाणी यांनी सोशल मीडियावर या प्रकरणाबद्दल पोस्ट लिहीली. ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली आणि घडल्या प्रकाराबद्दल माहिती पुढे आली. वाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत..” हे वाक्य एका 3 वर्षे 8 महिन्याच्या मुलीचं.. आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की, शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं.