Badlapur Gas Leak: बदलापूरमधील कारखान्यातून गॅस गळती; नागरिकांना सुरु झाला उलट्या आणि खोकल्याचा त्रास

गुरुवारी रात्री 10.22 वाजता ही गॅस गळतीची घटना घडली. यानंतर, जवळपास राहणाऱ्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला

Visuals from Badlapur. (Photo/ ANI)

गुरुवारी रात्री, महाराष्ट्रातील बदलापूर (Badlapur) येथील एका कारखान्यात गॅस गळतीमुळे (Gas Leak) घबराट पसरली. गुरुवारी रात्री 10.22 वाजता ही गॅस गळतीची घटना घडली. यानंतर, जवळपास राहणाऱ्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अग्निशमन दलाला तातडीने बोलविण्यात आले आणि त्यांनी गॅस गळती नियंत्रणात आणली. ठाणे महानगरपालिकेने सांगितले आहे की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र केमिकल गॅस गळतीमुळे स्थानिक लोकांना उलट्या, मळमळ आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

गॅस गळतीची बातमी मिळताच परिसरात खळबळ उडाली. जेव्हा पोलिस आणि अग्निशमन दलाने लोकांना हा गॅस विषारी नसल्याचे सांगितले तेव्हा लोकांमधील भीती कमी झाली. त्यानंतर लोक त्यांच्या घरी परतले. सुमारे 3 किमीच्या परिघात या वायूच्या गळतीचा परिणाम झाला आहे. या दरम्यान बर्‍याच लोकांना उतल्या, मळमळ, खोकला अशा आरोग्याचा समस्या निर्माण झाल्या. एमआयडीसी परिसरातील नोबल इंटर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे ही गळती झाली.

कंपनी रिएक्टरमध्ये कच्च्या तेलासाठी दोन रसायने, सल्फ्यूरिक ॲसिड आणि बेंझिन डिहायड्रेड यांचे मिश्रण करते. मात्र, आवश्यक तापमान नियंत्रित करताना काही चूक झाली व रिएक्टरमधून गॅस गळती सुरु झाली. सांगण्यात आले आहे की, हा वायू विषारी नाही परंतु गळतीमुळे श्वास घेणे कठीण होते. तसेच यामुळे शरीराच्या त्वचेला आणि डोळ्यांना नुकसान होऊ शकते. बदलापूर अग्निशमन अधिकारी भागवत सोनन म्हणाले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून लोकांना घाबरण्याची गरज नाही.

दुसरीकडे ठाण्याला लागून असलेल्या भिवंडी भागात भीषण आग लागली. या आगीत 15 गोदाम जळून खाक झाले. प्राप्त माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही.