Baba Maharaj Satarkar Passes Away: बाबा महाराज सातारकर यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ते 89 वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता नेरुळ येथील विठ्ठल जिमखाना मंदिरात त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच, उद्या (शुक्रवार, 26 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर नेरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Baba Maharaj Satarkar News: ज्येष्ठ कीर्तनकार, निरुपणकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता नेरुळ येथील विठ्ठल जिमखाना मंदिरात त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच, उद्या (शुक्रवार, 26 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर नेरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. वारकरी सांप्रदायामध्ये बाबा महाराज सातारकर यांना विशेष आदर होता. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे. तसेच, त्यांच्या कीर्तनाच्या ध्वनीमुद्रिका आणि अलिकडील काही काळामध्ये ध्वनिचित्रफीती मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत्या. त्यांच्या कीर्तनाचे अनेक व्हिडिओ You Tube वरही उपलब्ध आहेत.
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर नावाने प्रसिद्ध असलेले हे कीर्तनकार वारकरी सांप्रदायामध्ये विशेष प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी झाला. कीर्तानसोबतच प्रवचन आणि निरुपनकार म्हणूनही विशेष लोकप्रिय होते. सातारा येथील नामवंत गोरे कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. मात्र ते गोरे ऐवजी सातारकर या नावानेच प्रसिद्ध पावले, ओळखले जाऊ लागले. विशेष म्हणजे त्यांच्या घराण्याला कीर्तनाची परंपरा लाभली आहे. त्यामुळे त्यांच्या घरात तीन पिढ्यांपासून कीर्तन, प्रवचन चालत असे. त्यांच्या घराण्यातील कीर्तनाचा सातारकर फड विशेष प्रसिद्ध होता.
वारकरी सांप्रदायामध्ये आद्य कीर्तनकार म्हणून सातारकर कुटुंबीयांचे नाव घेतले जात असे. शैक्षणीक बाबतीत सांगायचे तर कायद्याचे म्हणजे वकिलीचे शिक्षण घेतले असले तरी बाबा महाराज त्या व्यवसायात रमले नाहीत. त्यांनी आपला घराण्यात परंपरेने चालत आलेला कीर्तन, प्रवचनातच स्वत:ला वाहून घेतले. बाबा महाराज कीर्तनाच्या ज्या सातारकर फडातून येतात त्याची सुरुवात प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी केली. खास करुन ते हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर प्रवचने देत. त्यांच्या पश्चात त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराजांनी ही परंपरा सुरु ठेवली. पुढे 1962 मध्ये अप्पामहाराज यांचे निधन झाल्यानंतर फडाची ही धुरा नीळकंठ गोरे अर्थातच बाबा महाराज सातारकर यांनी खाद्यावर घेतली आणि यशस्वीरित्या सांभाळीसुद्धा.
एक्स पोस्ट
बाबा महाराज सातारकर यांच्या जाण्याने वारकरी सांप्रदायातील महत्त्वाचा चेहरा हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे. बाबा महाराजांच्या कीर्तनास महिला वर्गाचा विशेष पाठिंबा पाहायला मिळत असे. त्यांच्या कीर्तनाला महिलांची विशेष गर्दी नेहमीच पाहायला मिळत असे. शिवाय पुरुष वारकरी आणि कीर्तनकारांमध्ये बाबा महाराज यांची विशेष छाप पाहायला मिळत असे.