Ayodhya Ram Temple: राम मंदिर उद्घाटनानंतर महाराष्ट्रातून धावणार ‘अयोध्या स्पेशल’ ट्रेन; Shivsena UBT म्हणतात, 'देशातील लोकांचे वास्तविक समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा मार्ग'
22 जानेवारी रोजी होणाऱ्या 'दीपोत्सवा'साठी मुंबईतील प्रत्येक प्रभागातील सुमारे 10,000 घरांमध्ये दिवे लावले जातील, असे शेलार म्हणाले.
येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या (Ayodhya) येथे मोठ्या थाटामाटात भव्य राम मंदिराचे (Ram Temple) उद्घाटन होणार आहे. या दिवसाबाबत देशभरात उत्साह दिसून येत आहे. मंदिराच्या उद्घाटनानंतर भक्त मोठ्या प्रमाणात अयोध्येमध्ये रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचण्याची अपेक्षा आहे. 22 जानेवारी रोजी मंदिराच्या उद्घाटनानंतर भाविकांना राम मंदिरापर्यंत नेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून अयोध्येसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरुवारी एका निवेदनात याबाबत माहिती दिली.
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन आणि उत्सवात सहभागी होण्यासाठी पक्षाने मुंबईतील प्रमुख मंदिरांमध्ये विशेष तरतूद केल्याचे भाजपने म्हटले आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या 'दीपोत्सवा'साठी मुंबईतील प्रत्येक प्रभागातील सुमारे 10,000 घरांमध्ये दिवे लावले जातील, असे शेलार म्हणाले. राज्यातील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा दिवस धुमधडाक्यात साजरा करण्याची जोरदार तयारी केली आहे. शेलार म्हणाले की, ‘राम मंदिराचे उद्घाटन हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे. हे संतांच्या आशांची पूर्तता आणि हजारो भक्तांच्या प्रार्थनांचा कळस आहे. विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांचे हे फळ आहे.’
दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत शेलार म्हणाले की, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कामाला सुरुवात केली असून, केंद्रीय भाजप नेतृत्वाने प्रत्येक राज्याला व्यापक कार्यक्रम दिला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी हे उपक्रम कसे राबवायचे याबाबत सूचना देण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. कोअर कमिटीची स्थापना केल्यानंतर, मुंबई स्तरावर निवडणूक समितीची स्थापना केली जाईल जी अनेक बैठकांचे आयोजन करेल आणि त्यानंतर प्रभाग स्तरावर मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करेल. (हेही वाचा: Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या उद्घाटनामुळे अर्थव्यवस्थेला मिळेल चालना; देशात अंदाजे 50,000 कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता- CAIT)
दरम्यान, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते अयोध्या राम मंदिर उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाहीत. केंद्र सरकारची खिल्ली उडवत राज्यसभा खासदार म्हणाले, ‘त्यांच्याकडे एक जाहिरात प्रणाली आहे ज्यानुसार ते काम करतात. अयोध्या राममंदिर उद्घाटन सोहळा हा देशातील लोकांचे बेरोजगारी, महागाई, काश्मीर आणि मणिपूर या वास्तविक समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा एक मार्ग आहे. भाजपच्या कार्यक्रमात आम्हाला हजेरी लावायची नाही, हा राष्ट्रीय कार्यक्रम नाही, तर हा भाजपचा कार्यक्रम आहे,’ असे राऊत म्हणाले. भाजपचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही (अयोध्येला) भेट देऊ, असेही त्यांनी सांगितले. राऊत पुढे म्हणाले की, राममंदिर आंदोलनासाठी शिवसेनेने रक्त दिले असून त्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि हजारो शिवसनिकांचे योगदान आहे.