डोंबिवलीमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर सोडले कुत्रे; पोलिस शिपाई जखमी
पोलिसांनी यातील दोघांना अटक केली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात सरकारकडून कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. कोरोना नियमांचा फज्जा उडवणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. मंगळवारी संध्याकाळी महापालिकेचे कर्मचारी डोंबिवलीतील खंबाळपाडा रोडवर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. यावेळी तिघांनी या कारवाईला विरोध करत पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर पाळलेले कुत्रे सोडले. या कुत्र्यांनी महापालिका पथकातील अनिल तायडे या पोलिस शिपायाच्या पायाचा चावा घेतला. यात तायडे गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात कोरोना नियमांचे उल्लघंन करणारे आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता आणि आदित्य गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील दोघांना अटक केली आहे. यातील आदित्य गुप्ता नावाची व्यक्ती फरार आहे. पोलिस त्याचा तपास करत आहेत. (वाचा - भारतात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट! गेल्या 24 तासात 3,79,257 रुग्ण, तर 3645 जणांचा मृत्यू)
महापालिकेकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत असून त्यांच्याकडून दंड वसून करण्यात येत आहे. मंगळवारी संध्याकाळी आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता आणि आदित्य गुप्ता हे विनामास्क खंबाळपाडा रोडवरील गणेश ऑटोमोबाइल्स गॅरेज सुरू ठेऊन बसले होते. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना विनामास्क बसल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगितला. परंतु, या तिघांनी या पथकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करत दंड भरण्यास नकार दिला. यानंतर पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना गॅरेजमध्ये असलेल्या दोन्ही पाळीव कुत्र्यांना बाहेर काढून दुकान बंद करण्यास सांगितले. मात्र, या तिघांनी यास विरोध करून कुत्र्यांना पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर सोडले.
यावेळी एका कुत्र्याने अनिल तायडे या पोलिस कर्मचाऱ्याचा चावा घेतला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी या तिघांना पोलिस स्टेशनमध्ये नेले. मात्र, यावेळी यातील आदित्य गुप्ता या तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस त्याचा तपास करत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.