Attack On Ex MLA Sangeeta Thombre: माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी, रुग्णालयात दाखल
संगीता ठोंबरे अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आटपून परतत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली.
बीडच्या केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangeeta Thombre) यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली गावात त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला असून यामध्ये संगीता ठोंबरे आणि त्यांचे चालक जखमी झाले आहे. सध्या त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय केज मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चालकाच्या बाजूच्या दिशेने दगड फेकण्यात आले. यामुळे गाडीची काच फुटली. नंतर तो दगड संगीता यांचे चालक किशोर मोरे यांना लागला. या दगडफेकीमध्ये दोघेही जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस सध्या हल्ला का करण्यात आला याचा तपास करत आहेत.
संगीता ठोंबरे आणि चालक किशोर मोरे यांच्या वर झालेला हल्ला हा संंध्याकाळी सहाच्या सुमारास झाला आहे. त्यांना किरकोळ जखमा झाल्याचं समोर आलं आहे. मीडीया रिपोर्ट नुसार, मद्यधुंद अवस्थेतील विजय उत्तमराव गदळे यांनी संगीता यांच्याशी असभ्य भाषेत बोलुन, त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आहे. गावकर्यांनी विजय गदळेला चोप दिला आहे.