Maharashtra: ATS कडे अधिकाऱ्यांची कमतरता; DGP Sanjay Pandey यांचे फेसबुक पोस्टद्वारे तरुणांना अर्ज करण्याचे आवाहन, जास्त पगाराची ऑफर

याचे मुख्य कारण म्हणजे आता बहुतांश संवेदनशील प्रकरणे थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) हातात जातात

DGP Sanjay Pandey (संग्रहित संपादित प्रतिमा)

एकेकाळी महाराष्ट्रात दहशतवादाविरुद्ध अनेक यशस्वी कारवाया करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (ATS) सध्या अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. खुद्द महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी फेसबुक पेजवर एटीएसमध्ये काम करण्यासाठी तरुणांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ज्या अधिकाऱ्यांना एटीएसमध्ये काम करायचे आहे त्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटावे.

संजय पांडे यांनी म्हटले आहे की, मुंबईत दहशतवादीविरोधी पथकात पोलीस अधीक्षकाची (SP) दोन पदे रिक्त आहेत. दहशतवादीविरोधी पथकातील नियुक्ती/पोस्टिंग ही एक प्रतिष्ठेची नियुक्ती समजली जाते. ज्यात, 25 % विशेष भत्ता दिला जातो. या पदांसाठी जे अधिकारी इच्छुक आहेत ते अधिकारी थेट अपर पोलीस महासंचालक, दहशतवादीविरोधी पथक यांच्याशी अथवा अपर पोलीस महासंचालक, आस्थापना विभाग यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा त्या पदांसाठी आपला प्राधान्यक्रम देखील कळवू शकतात.

यापूर्वी एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून पथकासाठी अधिकाऱ्यांची मागणी केली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या दोन उच्चपदस्थांनी केलेली ही विनंती एटीएसमध्ये मोठ्या पोलीस बळाच्या कमतरतेकडे लक्ष वेधते. महाराष्ट्र एटीएस ही एकेकाळी देशातील हायप्रोफाईल युनिट मानली जात होती, मात्र अलीकडच्या काळात एटीएसमध्ये काम करण्याची क्रेझ कमी झाल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: RBI Assistant Recruitment: आरबीआयमध्ये 950 सहाय्यक पदासाठी नोकर भर्ती, जाणून घ्या योग्यतेसह अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक)

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांना सांगितले की, एटीएसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाची मोठी कमतरता आहे, ज्यामध्ये चार प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे त्वरित भरली जावीत.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र एटीएसचा चार्म कमी झाल्याचे एटीएसमध्ये काम करणाऱ्या अनेक विद्यमान आणि माजी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आता बहुतांश संवेदनशील प्रकरणे थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) हातात जातात. राज्य एटीएसकडे फार कमी प्रकरणे येतात. महाराष्ट्रात एटीएसची प्रमुख पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त होती. याशिवाय डीआयजी शिवदीप लांडे हे देखील 26 नोव्हेंबर 2021 रोजी एटीएस सोडून बिहार केडरमध्ये रुजू झाले आहेत.