IPL Auction 2025 Live

Ashok Chavan Join BJP: अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश; राज्यातील बडे नेते उपस्थीत, समर्थकांची मोठी गर्दी

मुंबई येथील भाजप मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत पाठिमागील दोन वर्षांपासून चर्चा सुरु होती. या चर्चेला आज मूर्त रुप प्राप्त झाले.

Ashok Chavan To Join BJP | (Photo Credits: X)

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश (Ashok Chavan Join BJP) केला. मुंबई येथील भाजप मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत पाठिमागील दोन वर्षांपासून चर्चा सुरु होती. या चर्चेला आज मूर्त रुप प्राप्त झाले. काँग्रेस (Congress) पक्ष आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर एकदोन दिवसांमध्ये आपण आपला निर्णय स्पष्ट करु असे अशोक चव्हाण यांनी काल म्हटले होते. दरम्यान, त्यांनी पुढच्या काहीच तासात कमळ हातात घेतले. या पक्षप्रवेशावेळी समर्थकांची मोठी गर्दी होती. भाजप कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते.

अशोक चव्हाण यांनी स्वीकारले पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थीतीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांच्याकडून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरून घेतला. त्यानंतर त्यांच्या गळ्यात भाजपचा गमछा टाकून चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला. याच वेळी अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक माजी आमदार राजूरकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला. (हेही वाचा, Ashok Chavan To Join BJP Today: अशोक चव्हाण यांचा आजच भाजप प्रवेश; राज्यसभा उमदवारी मिळण्याची शक्यता)

भाजपची ध्येय धोरणे विचारात घेऊन काम करेन- अशोक चव्हाण

भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. भाजपची ध्येय धोरणे विचारात घेऊन काम करेन. महाराष्ट्रात पक्षवढीसाठी प्रयत्न करेन. काँग्रेसमध्ये मी शेवटच्या क्षणापर्यंत काम  केले. नेहमी मी पक्षकार्यास प्राधान्य दिले. आज पक्ष सोडतो आहे म्हणून मी कोणावर टीका करणार नाही. कोणावरही व्यक्तीगत टीका करणे हा माझा स्वभाव नाही. ठिक आहे. गेली कित्येक वर्षे आम्ही एकत्र काम केले. त्या पक्षात (काँग्रेस) काम करत असताना मला कोणीही जा म्हणून सांगितले नाही. पण, हा माझा व्यक्तीगत निर्णय आहे. मला वाटत होते आता बदल करायला हवा. त्यामुळे मी तो निर्णय घेतला. माझ्या निर्णयाला पक्षातील, विरोधकांतील अनेकांनी पाठिंबा दिला. त्या सर्वांचा मी आभारी आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut on Ashok Chavan and BJP: महात्मा गांधी यांचा विचार राबवत भाजपकडून काँग्रेस पक्षाचे शुद्धीकरण- संजय राऊत)

व्हिडिओ

'आमच्यासाठी आनंदाचा दिवस'

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. आमच्यासाठी आजचा आनंदाचा दिवस आहे. त्यांनी पक्षामध्ये कोणत्याही पदाची आपेक्षा केली नाही.  त्यांची फक्त येवढीच आपेक्षा आहे की, विकासकामांसाठी आवश्यक संधी मिळाव्यात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न देशभरातील जनतेला भावले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतत्वाखाली काम करण्यासाठी देशभरतील विविध पक्षांतील अनेक नेते तयार आहेत. आगामी काळात देशभरातील अनेक नेते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. काँग्रेसला त्यांचे बडे नेते आणि पक्ष सांभाळता येत नाही, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.