अजित पवार यांना धक्का; नवाब मलिक यांचे भाजपला वावडे; आशिष शेलार स्पष्ट बोलले

त्यामुळे अजित पवार यांची भूमिका काय राहते याबाबत उत्सुकता आहे.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

महायुतीमध्ये भाजप (BJP) हा प्रमुख घटक पक्ष आहे. तो केवळ प्रमुख पक्षच नव्हे तर इतर दोन घटकपक्ष असलेल्या CM एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर नियंत्रणही ठेऊ पाहात आहे. नवाब मलिक () यांच्यावरुन भाजपने घेतलेली भूमिका पाहता दादा गटाची पूर्ण कोंडी झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव असलेले आणि मुंबईतील प्रमुख नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मलिक यांच्याबद्दल भाजपची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मलिक यांच्यावर दाऊद इब्राईम याच्यासोबत जोडले गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचे काम भाजप करणार नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नवाब मलिक की भाजपा? अजित पवार यांच्यासमोर प्रश्न

नवाब मलिक हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी सुरुवातीपासूनच संगर्षाचा मुद्दा राहिला आहे. मलिक यांना पक्षात प्रवेश देऊ नये याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द अजित पवार यांना पत्र लिहिल्याचे वृत्त तेव्हा प्रसारमाध्यमांनीच दिले होते. तरीही अजित पवार यांनी त्यांना पक्षात स्थान दिले. विधिमंडळातही मलिक हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूला बसत. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांच्या कन्या सना मलिक यांना पक्षाने अणुशक्तीनगर येथून उमेदवारीही दिली आहे. पण, मलिक यांनाही अजित पवार उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा होत्या. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2024: Sana Malik-Sheikh अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून मैदानात; अजित पवार यांच्या NCP कडून उमेदवारी)

मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, दाऊदशी संबंध असणाऱ्या मलिक यांच्यासाठी भाजप कार्यकर्ते काम करणार नाही. आमची ही भूमिका आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. (हेही वाचा, Mahim Vidhan Sabha: माहिमचा हलवा कोणाचा? उद्धव ठाकरे यांचा उमेदवार मैदानात; सदा सरवणकर आणि मनसे प्रमुखांच्या चिरंजीवांसमोर आव्हान)

भाजपचा अमित ठाकरे यांना पाठिंबा?

अमित ठाकरे हे आमच्या परिवारातील घटक आहेत. राज यांच्याशी आमचे राजकारणापलिकडचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांचे चिरंजीव जर पहिल्यांदाच विधानसभेसाठी उभे असतील तर, त्यांना विरोध होऊ नये. महायुतीने त्यांना पाठींबा द्यावा, अशी आमची भावना असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. उल्लेखनीय असे की, ज्या माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढत आहे तो मतदारसंघ युतीच्या जागावाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडे गेला आहे. त्या ठिकाणाहून सेनेने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. आता दिलेली उमेदवारी शिंदे परत घेणार का याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला उदय सामंत यांनी सरवणकर हे पडत्या काळात पक्षासोबत होते, असे म्हणत उमेदवारी कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अमित यांच्याबद्दल दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.