Arnab Goswami Arrest Case: हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीला पाठींबा देण्याचा भाजपला अधिकार- संजय राऊत
त्यांनी त्यांची वेदना समजून घ्यायला हवी. लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार भाजप आंदोलन करु शकतो. तो त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असू शकतो. परंतू, त्यांनी नाईक कुटुंबीयांच्या भावना समजून घ्यायला हव्यात, असेही राऊत म्हणाले.
एखाद्याच्या हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीला पाठींबा देण्याचा पूर्ण अधिकार भाजपला (BJP) आहे, असा टोला शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपला लगावला आहे. अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक झाल्यानंतर भाजपने केलेल्या टीकेनंतर राऊत यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत असा अधिकार मिळतो. त्यामुळे एखाद्याला पाठींबा देणे आणि निशेध करणे याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतू, मी हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की कोणावरही सुडबुद्धीने कारवाई होणार नाही. तसेच कोणावर अन्यायही होणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, भारतीय दंड संहिता कलम 306 आणि 307 अन्वये एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल. त्याबाबत भाजपला निशेध करायचा असेल तर त्यांनी तो जरुर करावा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाल तो हक्क आहे. परंतू, कोणावरही अन्याय होणार नाही, याबाबत मी खात्रीने सांगू शकतो. वाचकांच्या माहितीसाठी असे की, कलम 306 हे आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि 307 हे हत्येचा प्रयत्न करण्याविरोधात लावले जाते असे कायद्याचे अभ्यासक सांगतात.
संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, भाजप नेत्यांनी अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला हवी. त्यांनी त्यांची वेदना समजून घ्यायला हवी. लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार भाजप आंदोलन करु शकतो. तो त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असू शकतो. परंतू, त्यांनी नाईक कुटुंबीयांच्या भावना समजून घ्यायला हव्यात, असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, Tajinder Bagga Posters : अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपच्या तेजींदर बग्गा यांच्याकडून 'महाराष्ट्र सदन' इमारतीसमोर पोस्टरबाजी, 'आणीबाणी 0.2' असा उल्लेख)
'सामना' हे जसे शिवसेनेचे मुखपत्र आहे तसेच रिपब्लिक हा भाजपचा लाऊडस्पीकर आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. त्यामुळेच भाजप नेते रिया चक्रवर्ती हिच्याबाबत वेगळी आणि अर्नब गोस्वामी याच्याबद्दल वेगळी भूमिका घेतात.
दरम्यान, अर्नब गोस्वामी याच्या अटकेवरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. भाजप नेते आशीश शेलार यांनी राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले असून, तुमच्या सदऱ्यावर अग्रलेखाचे डाग दिसू लागले आहेत, असे म्हटले आहे. तसेच, ''रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन "दिशा सालीयन" बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी...'' असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.