Arnab Goswami Arrest Case: अर्नब गोस्वामी यांच्या अंतरिम जामीनावर आज पुन्हा सुनावणी

काल सुनावणी अपूर्ण राहिली होती. त्यामुळे आज पुन्हा सुनावणी आहे. मात्र आज सुनावणी पूर्ण न झाल्यास दिवाळीच्या सुटु्टीनंतर घ्यावी लागणार आहे.

Arnab Goswami | (Photo Credits: ANI)

रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या तातडीच्या अंतरिम जामीनावर (Interim Bail) आज (7 नोव्हेंबर) पुन्हा सुनावणी होणार आहे. काल (6 नोव्हेंबर) सुनावणी अपूर्ण राहिली होती. त्यामुळे आज पुन्हा सुनावणी आहे. मात्र आज सुनावणी पूर्ण न झाल्यास दिवाळीच्या सुट्टीनंतर घ्यावी लागणार आहे. दरम्यान, तातडीच्या अंतरिम जामिनाव्यतिरिक्त अन्य मुद्दयांबाबत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सर्व मुद्द्यांवर याचिका घ्यायची की केवळ तातडीच्या अंतरिम जामिनावर हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आज केवळ तातडीच्या अंतरिम जामिनावर सुनावणई होणार असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्नब यांच्या वतीने विधिज्ञ हरिश साळवे आणि अ‍ॅड्. आबाद पोंडा यांनी युक्तीवाद केला असून सत्तेचा दुरुपयोग करुन त्यांना धडा शिकवण्यासाठी अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाची दिवाळीची सुट्टी लक्षात घेऊनच ही अटक करण्यात आली. त्यामुळे अर्नब यांना जामिन मिळण्यास वेळ लागेल, असेही साळवे यांनी म्हटले आहे. दरम्यान, आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (रायगड SP ना MHRC कडून नोटीस; Material Records घेऊन आज 11 वाजता हजर राहण्याचे आदेश)

वास्तूविशारद अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल अर्नब गोस्वामी यांना अटक झाली आहे. अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीच्या स्टुडिओचे काम केले होते. मात्र त्याचा मोबदला त्यांना देण्यात आला नाही. अर्नब यांनी पैसे बुडवल्यातून आलेल्या नैराश्यातून 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील घरात आत्महत्या केली. त्यानंतर बुधवारी अर्नब गोस्वामी यांनी पनवेल येथील घरातून अलिबाग पोलिसांनी अटक केली असून त्यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. भाजप पक्षाने मात्र आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी राज्यात आणीबाणीची परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेने हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशा असल्याची जोरदार टीका सामना अग्रलेखातून केली आहे.