Covid19: नवी मुंबई येथील एपीएमसी बाजारातील आणखी एका व्यापाऱ्याला कोरोना विषाणूची लागण

खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरवणारेही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत असल्याचे समोर येऊ लागले आहे. यातच नवी मुंबई (Navi Mumbai) येथील एपीएमसी बाजारातील (APMC Market) आणखी एका व्यापाऱ्याला कोरोना विषाणूची संसर्ग झाला आहे. या व्यापाऱ्याला कोरोना झाल्याचे समजताच बाजारातील व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्यापारी सानपाड्यातील पामबीचजवळ राहतो. या व्यक्तीला उपचारासाठी वाशीच्या मनपा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर काही दिवस एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर मार्केट सुरु झाल्यावर अनेक ग्राहकांनी आणि व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी केली. ही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी समितीच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटच्या गेटवर थर्मल चेकअप, सॅनिटायझर आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश देण्यात यावा, अशा जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आला. एवढेच नव्हेतर, या सूचनाचे पालन करणाऱ्या व्यक्तीला 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नवी मुंबई पालिकेने एपीएमसी बाजार सुरु करण्याची परवानगी दिली होती. हे देखील वाचा- Coronavirus Lockdown: भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना दिलासा! घरभाडे वसूली 3 महिने पुढे ढकलण्याची राज्य सरकारची घरमालकांना सूचना

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात 170 जागेची हॉटस्पॉट यादी जाहीर करण्यात आले आहे. या यादीत नवी मुंबईचा समावेश आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 54 वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत असल्याने नवी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.