मंदिरं उघडण्यावरुन अण्णा हजारे आक्रमक; ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा

मंदिरं 10 दिवसांत न उघडल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

अण्णा हजारे (Photo Credits: IANS)

राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिरं 10 दिवसांत न उघडल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) दिला आहे. मंदिरं उघडण्यात सरकारला काय अडचण आहे? दारुची दुकानं, हॉटेल्स सर्व काही खुलं केलं आहे. तिथल्या गर्दीतून कोरोना होत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच मंदिरातून मिळणाऱ्या सात्विक ऊर्जेतून माणसं घडत असतात. ती बंद करुन सरकारने काय साध्य केले? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

"मंदिरं उघडण्यासाठी रस्त्यावर उतरा. मोठं आंदोलन उभारा. मी स्वत: त्यात सहभागी होईन. 10 दिवसात जर मंदिरं उडण्याचा निर्णय सरकाने न घेतल्यास जेल भोरो आंदोलन करा मी तुमच्या बरोबर असेन," असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. (Maharashtra: राज्यात दारुची दुकाने सुरु पण मंदिर बंद ठेवल्याने देवेंद्र फडणवीस आक्रमक, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करुन सरकारने निर्णय घेण्याची मागणी)

"मी आज 84 वर्षांचा आहे. पण माझ्यावर कोणताही डाग नाही. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी जवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालो आहे. माझा विश्वास आहे की भरकटत चाललेल्या समाजाला फक्त मंदिरच तारु शकतात. त्यमुळे संतांचे विचार देणारी मंदिरं बंद का? संतांचे विचार सरकारला समजले नाहीत का?," असं म्हणत त्वरीत मंदिरं उघडण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान, आज अहमदनगरच्या मंदिर बचाव कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली आणि राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरं उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तर पुढील काळात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचं मंदिर बचाव कृती समितीचे प्रमुख वसंत लोढा यांनी यावेळी सांगितले.