अण्णा हजारे यांचा बेमुदत संपाचा इशारा; वॉक-इन शॉप्समध्ये वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र
द्राक्षापासून वाईन तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. भाजपला शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही. विरोध करणे हे त्यांचे काम आहे
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्र सरकारच्या सुपरमार्केट आणि वॉक-इन शॉप्समध्ये मद्यविक्रीला (Wine) परवानगी देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात बेमुदत संपाचा इशारा अण्णा हजारे यांनी पत्रात दिला आहे. काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये दारू विक्रीला परवानगी देण्याचा सरकारचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. अण्णा हजारे यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती.
अण्णा हजारे म्हणाले होते की, व्यसनमुक्तीसाठी काम करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, मात्र राज्य सरकार आर्थिक फायद्यासाठी असे निर्णय घेत असल्याचे पाहून वाईट वाटते. यामुळे लोक दारूच्या आहारी जाऊ शकतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. सरकारचा हा निर्णय राज्याला कुठे घेऊन जाईल, हे आता पाहावे लागेल. वर्षभरात 1000 कोटी लिटर दारू विकण्याचे उद्दिष्ट असलेले सरकार प्रत्यक्षात काय साध्य करणार आहे? हा खरा प्रश्न आहे, असे अण्णा हजारे म्हणाले होते.
आता हजारे यांनी संपाचा इशारा दिला आहे. 1000 स्क्वेअर फुटांच्या छोट्या दुकानांना वाइन विकण्याची परवानगी दिली गेली आहे. याबाबत मंत्री नवाब मलिक म्हणाले होते की, महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे उत्पन्न फळांपासून बनवलेल्या वाइनवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप (Shelf in Shop) या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय झाला आहे. राज्याचे वाईन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच, वाईन उद्योगास चालना मिळावी या हेतुने राबविण्यात येत आहे.
सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना संजय राऊत यांनी म्हटले होते की, ही दारू नाही. द्राक्षापासून वाईन तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. भाजपला शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही. विरोध करणे हे त्यांचे काम आहे. शेतकऱ्यांना वाईनरी उद्योगाकडून आर्थिक मदत मिळत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.