एकनाथ खडसे यांना अप्रत्यक्ष टोला मारण्या एवढे तुम्ही मोठे नाही; अनिल महाजन यांची आशिष शेलार यांच्यावर टीका

तुम्ही स्वत:ही आमदार, मंत्री झाला नसतात. त्यामुळे एकनाथ खडसे यांचे उपकार विसरु नका, अशा शब्दात ओबीसी नेते अनिल महाजन यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे.

Anil Mahajan | (Photo Credits- File Photo)

एकनाथ खडसे भाजपमध्ये नसते तर तुम्ही आणि तुमचे मित्र डाळ-भात खात हाफ चड्डीमध्ये कुठेतरी कवायत करताना दिसले असते. तुम्ही स्वत:ही आमदार, मंत्री झाला नसतात. त्यामुळे एकनाथ खडसे यांचे उपकार विसरु नका, अशा शब्दात ओबीसी नेते अनिल महाजन यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवला. त्याची फळे आपण खाल्लीत, असा टोलाही महाजन यांनी शेलार यांना लगावला आहे.

आशिष शेरार यांच्यावर टीका करताना अनिल महाजन यांनी पुढे म्हटले की, शेलार यांनी त्यांचा बांद्रा वेस्ट हा स्वत:चा मतदारसंघ पाहावा. त्या ठिकाणच्या विकासकामांवर लक्ष केंद्रीत करावे. तिथे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी भरते, गटारी-नाले तुंबतात. लोकांना पार्किची व्यवस्था नाही. त्यामुळे तिथली कामे सोडून इकडे जळगावमध्ये लक्ष घालू नये. इथे येऊन खानदेशच्या लोकांना ज्ञान देत बसू नये. एकनाथ खडसे यांच्यावर बोलत बसण्यापेक्षा तुमच्या राज्यपालांना सांगून राज्यमंत्रीमंडळाने शिफारस केलेल्या 12 आमदारांची यादी मंजूर करावी, असेही महाजन यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे यांना आपण घाबरता. ते जर विधानपरिषदेत आमदार म्हणून आले तर तुमच्या कुंडल्या बाहेर निघतील. त्या बाहेर आले तर कठीण होऊन जाईल. म्हणूनच राज्यपालांच्या खाद्यावर बंदूक ठेऊन एकनाथ खडसे हे कसे आमदार होणार नाहीत, हे आपण पाहात असता. भाजपमध्ये असलेल्या अनेक बड्या नेत्यांचेही उद्योग, कारखाने, आहेत. त्यांच्याही उद्योग व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असते. परंतू, त्यांच्यामागे इडी, सीबीआय लागत नाही. ती फक्त विरोधकांच्या पाठी लागते. केंद्रातील या संस्था कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे काय ठाऊक नाही काय, असेही महाजन म्हणाले.