Anil Deshmukh At Nagpur: अनिल देशमुख तब्बल 14 महिन्यांनंतर मतदारसंघात परतले; नागपूर विमानतळावर जंगी स्वागत
नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पोहोचताच त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. सीबीआय आणि ईडीने अटक केल्यानंतर 14 महिन्यांनी जामीन मिळाल्यानंतर प्रथमच ते मतदारसंघातील आपल्या घरी पोहोचत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तब्बल 14 महिन्यांनी आपल्या मतदारसंघात परतले. नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पोहोचताच त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. सीबीआय आणि ईडीने अटक केल्यानंतर 14 महिन्यांनी जामीन मिळाल्यानंतर प्रथमच ते मतदारसंघातील आपल्या घरी पोहोचत आहेत. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. अनिल देशमुख जेव्हा नागपूर विमानतळावर पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सर्व कार्यकर्ते आनंदाने जल्लोष करत होते.
प्रदीर्घ काळापासून मतदारसंघात पोहोचल्याबद्दल अनिल देशमुख यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्यात आली. बराच काळ कोठडीत ठेवण्यात आले. मात्र, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्याय देवतेने योग्य तो निर्णय घेत मला जामीन मंजूर केला. मी बराच काळ मतदार संघात नव्हतो. त्यामुळे कार्यकर्ता, मतदार यांच्याशी माझा थेट संपर्क होऊ शकला नाही. परंतू, असे असले तरी माझा मूलगा सलील नेहमी मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात होता. तो त्यांना आवश्यक ती सर्व मदत करत होता. आता मी पुन्हा मतदारसंघात जातो आहे. पहिल्यासारखाच सक्रीय होईल, असेही अनिल देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. (हेही वाचा, अनिल देशमुख सक्रीय; कापसाला प्रति क्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र)
अनिल देममुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. प्रामुख्याने मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली होती. या आरोपाने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला. हा आरोप झाला तेव्हा अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. एका कॅबिनेट मंत्र्यावर असा आरोप झाल्याने सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. परिणामी त्यांना राजीनामा द्यावा लागला. हा आरोप अधिक खळबळजनक ठकरण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे मनसूख हिरेन हत्या प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या. या प्रकरणाचा तपास सुरु असताना तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भूमिका महत्त्वाची होती. यात या दोघांनाही अटक झाली. परिणामी या आरोपांतील गांभीर्य वाढले गेले.