Bhima Koregaon Case: 'शहरी नक्षलवाद' प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर, तरीही मुक्काम तुरुंगातच; घ्या जाणून

आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना जामीन मंजूर होताच एनआयएनं (NIA) त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हाना देण्यासाठी परवानगी मागितली आहे.

Anand Teltumbde | Representational Image (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Violence Case) आणि शहरी नक्षलवाद ( Urban Naxalism) प्रकरणामुळे चर्चेत असलेले आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना जामीन मंजूर होताच एनआयएनं (NIA) त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हाना देण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला असला तरी पुढचे काही काळ त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांच्या जामीन निकालाला एक आठवड्याची स्थगिती मिळाली आहे.

आनंद तेलतुंबडे हे भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून सध्या त्यांची रवानगी तुरुंगात आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. तेलतुंबडे यांच्या जामीनास एनआयएचा आक्षेप आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल येताच एनआयएने कोर्टाकडे उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी मागितली. त्यामुळे कोर्टाने तेलतुंबडे यांच्या जामीन आदेशाला कोर्टाने एक आठवड्यांची स्थगिती दिली आहे. (हेही वाचा, Bhima Koregaon Case: गौतम नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य)

आनंद तेलतुंबडे यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या वेळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने आनंद तेलतुंबडे यांची बाजू योग्य ठरवत त्यांना जामीन मंजूर केला. एप्रील 2020 मध्ये अटक झाल्यापासून आनंद तेलतुंबडे हे तुरुंगात आहे. सध्या त्यांचा मुक्काम तळोजा कारागृहात आहे. तेलतुंबडे यांनी सुरुवातीला विशेष न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामीन मागितला होता. 31 डिसेंबर 2017 रोजी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेचा जो कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमास तेलतुंबडे हजर नव्हते. तसेच, त्यांनी कोणत्याही प्रकारे भडकाऊ भाषण केले नव्हते अशी बाजू त्यांनी याचिकेद्वारे मांडली होती. दरम्यान, त्यांना जामीन मंजूर झाला आहे.