Anand Mahindra यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला दिला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला

वाढते कोविड19 संकट नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने कठोर निर्बंध लागू केले असून लॉकडाऊनच्या नियोजनाची तयारी करा असे निर्देश दिले आहेत.

Anand Mahindra and CM Uddhav Thackeray (Photo Credits: PTI)

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. वाढते कोविड-19 (Covid-19) संकट नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने कठोर निर्बंध लागू केले असून लॉकडाऊनच्या (Lockdown) नियोजनाची तयारी करा असे निर्देश दिले आहेत. यावरुन आता अनेक स्तरावरुन प्रतिक्रीया उमटत आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा (Mahindra and Mahindra) उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया नोंदवत ठाकरे सरकारला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "उद्धवजी, अडचण अशी आहे की लॉकडाऊनमुळं फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. लॉकडाऊन मूलत: रुग्णालयं, आरोग्य सुविधा उभारणीसाठी होतं. आता आरोग्य सेवा उभारणीवर आणि मृत्यदर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करुया."

आनंद महिंद्रा ट्विट:

Anand Mahindra (Photo Credits: Twitter)

लॉकडाऊनचा परिणाम गरीबांवर होत असून आताही लॉकडाऊन केल्यास त्यात आणखी भर पडेल. म्हणून मूळ प्रश्नावर लक्ष केंद्रीत करुन कोरोनाचे संकट नियंत्रणात आणण्याचा सल्ला आनंद महिंद्रा यांनी दिला आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना नियमांचे नागरिकांकडून होत असलेले उल्लंघन यामुळेच लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यावरुन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत सरकारला हा सल्ला दिला आहे. दरम्यान, भाजपने देखील लॉकडाऊनच्या निर्देशानंतर ठाकरे सरकारवर टीका केली होती. तर वाढत्या रुग्णसंख्येला लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी म्हटले आहे.