Amravati Love Jihad Case: अमरावती लव्ह जिहाद प्रकरणाला नवे वळण; खासदार नवनीत राणा यांच्या आरोपांवरच संशय

नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा (Love Jihad) आरोप केलेल्या कथीत प्रकरणातील तरुणीचा छडा लागला आहे.

Amravati Police | (Photo Credit: Facebook)

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या खळबळजनक आरोपानंतर महाराष्ट्रभर सुरु असलेल्या अमरावती लव्ह जिहाद प्रकरणाला (Amravati Love Jihad Case) कलाटणी मिळाली आहे. नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा (Love Jihad) आरोप केलेल्या कथीत प्रकरणातील तरुणीचा छडा लागला आहे. सातारा पोलिसांच्या (Satara Police) एका पथकाला ही मुलगी सापडली आहे. ही मुलगी लव्ह जिहादमुळे नव्हे तर कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेली होती. असा जबाब सातारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाच्या आरोपावरच आता संशय निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.

खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणात लव्ह जिहादचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्येही गोंधळ घातला होता. या प्रकरणामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांतून काल (7 सप्टेंबर) दिवसभर प्रसिद्धी मिळवली. त्यांनी पोलीस्ट स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांसोबत घातलेली हुज्जतही प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरली. या सर्व कारनाम्यांमुळे अमरावतीतील बेपत्ता मुलीचे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले होते. त्यातच लव्ह जिहादचा मुद्दा पुढे आल्याने या प्रकरणाला धार्मिक वळणही प्राप्त झाले होते. पोलिसांवरील दडपणही वाढले होते. (हेही वाचा, Navneet Rana Statement: लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा आक्रमक, प्रकरण पोलीस दडपत असल्याचा केला आरोप)

दरम्यान, पोलिसांनी या मुलीला शोधून काढले असून, ही मुलगी लव्ह जिहादमुळे नव्हे तर घरच्यांच्या त्रासाला कंटाळूनच घर सोडून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. सातारा पोलिसांना ही मुलगी सापडली. या मुलीचा सातारा पोलिसांनी जबाब घेतला असता, ती घरच्यांच्या त्रासाला कंटाळूनच घरातून निघून गेल्याचे तिने सांगितले. दरम्यान, सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेली ही तरुणी आज मध्यरात्रीपर्यंत अमरावतीला पोहोचू शकेन. अमरावती मध्ये आल्यानंतर या तरुणीचा सविस्तरपणे जबाब घेतला जाईल, अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले की, ही तरुणी लव्ह जिहादमुळे नव्हे तर तिच्याच कुटुंबीयांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून घरातून निघून गेली होती.