Maharashtra Politics News: तिकीटांची कापाकापी? अमित शाह, जेपी नड्डा यांच्या दौऱ्यानंतर भाजप खासदारांचे धाबे दणाणले
ज्या खासदारांची कामगिरी सुमार दर्जाची असेल त्यांना पुढच्या निवडणुकीत तिकट कापून नारळ दिला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यानंतर ही चर्चा काहीशी अधिकच गतमान झाली आहे.
Maharashtra BJP MP News: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) तोंडावर आल्याने जवळपास सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात सत्ताधारी भाजप काहीसा अधिक. नेमक्या या तयारीमुळेच भाजप खासदारांची झोप उडवली आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, भाजप नेतृत्व महाराष्ट्रातील खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहे. ज्या खासदारांची कामगिरी सुमार दर्जाची असेल त्यांना पुढच्या निवडणुकीत तिकट कापून नारळ दिला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यानंतर ही चर्चा काहीशी अधिकच गतमान झाली आहे.
अमति शाह आणि जेपी नड्ड यांच्या दौऱ्यात कामगिरीचा आढावा
राजकीय सूत्रांनी सांगितले की, अमति शाह आणि जेपी नड्ड यांनी महाराष्ट्र दौऱ्यांमध्ये भाजप खासदारांच्या कामगिरीचा आढवा घेतला. यामध्ये काही खासदारांची कामगिरी बरी राहिली. मात्र, काहीच्या कामगिरीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे सुमार कामगिरी असलेल्या खासदारांप्रती नेतृत्वाने नाराजी व्यक्त केल्याचे समजते. परिणामी आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात बऱ्याच जागांवर बदल करण्यात येणार असल्याचे समजते. खास करुन मुंबईमध्ये अनेक खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो.
भाजप नेतृत्व खासदारांचा पत्ता खरोखरच कट करु शकते?
आगामी निवडणुकीमध्ये भाजप नेतृत्व खासदारांचा पत्ता खरोखरच कट करु शकते का? या प्रश्नाचे थेट उत्तर होय असे आहे. आतापर्यंत भाजपने घेतलेले निर्णय, टाकलेली पवले आणि आखलेली धोरणे पाहता अशा प्रकारे कोणाचेही तिकीट ऐनवेळी कापणे नवे नाही. अर्थात राजकारणात हे चालत असते, इतरही पक्ष असे करत असले तरी भाजप यात काहीसा निराळा आहे. सध्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. तिथे भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यात जवळपास नऊ खासदारांना विधानसभेचे तिकीट दिले आहे. इतकेच नव्हे तर त्यात तीन केंद्रीय मंत्री आहेत.
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये महाराष्ट्रात दिग्गजांना धक्के
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपने तत्कालीन उर्जामंत्री आणि विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. एकनाथ खडसे यांनाही तिकीट कापत दणका दिला होता. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे विधानपरिषदेवर पुनर्वसन होईल अशी अटकळ होती. मात्र, त्यांना आजपर्यंत वाटच पाहावी लागत आहे. त्यामुळे आगमी निवडणुकीत 'तेरा क्या होगा रे कालिया' असा सवाल भाजप खासदारांसमोर उभा ठाकला आहे.