'गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका'; मनसे नेते अमेय खोपकर यांचा आमदार सुरेश धस यांना इशारा
यामध्ये प्राजक्ता माळी चा देखील समावेश आहे. यावरूनच अमेय खोपकरांनी आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी ची माफी मागावी असं म्हटलं आहे.
बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत असताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी त्यांना कडक इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींचा उल्लेख केला आहे. यामध्ये प्राजक्ता माळी (Prajakta Mali) चा देखील समावेश आहे. यावरूनच अमेय खोपकरांनी आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी प्राजक्ता माळी ची माफी मागावी असं म्हटलं आहे.
प्राजक्ता माळी सोबत अमेय खोपकर यांनी बोलणं झाल्याचं म्हटलं आहे. यावेळी प्राजक्ताने केवळ 'हास्यजत्रेची टीम परळी मध्ये गेली होती. तेथे त्यांची भेट झाली. सत्कार स्वीकारला आणि याचा धन्यवाद म्हणून सोशल मीडीयात फोटो पोस्ट केल्याचं तिने म्हटलं आहे. असं अमेय खोपकर म्हणाले आहे. x वर पोस्ट करताना देखील 'सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत.' असे खोपकर म्हणाले आहेत.
अमेय खोपकर यांची पोस्ट
प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आज अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना करुणा मुंडे यांनी देखील प्राजक्ता माळी यांचा उल्लेख केला होता. तेव्हापासून सोशल मीडीयात प्राजक्ता माळी चं नाव घेऊन अनेक प्रकारे ट्रोलिंग सुरू आहे. दरम्यान यावरून आता प्राजक्ता महिला आयोगामध्ये तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.