Ambajogai Couple Dies in US: अंबाजोगाई येथील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू , चार वर्षांची मुलगी सुखरुप

परंतू, विहा नावाची त्यांची चार वर्षांची मुलगी घराच्या गॅलरीत खूप वेळ रडत होती. मुलीला बराच वेळ रडताना पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले.

Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथील एका दाम्पत्याचा अमेरिकेत (US ) संशयास्पद मृत्यू झाला आहे. या दाम्पत्याने आत्महत्या केली की त्यामागे काही आणखी कारण आहे हे समजू शकले नाही. महत्त्वाचे म्हणजे या दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी सुरक्षीत आहे. बालाजी भारत रुद्रवार (Balaji Bharat Rudrawar) (वय 32 वर्ष) आणि आरती बालाजी रुद्रवार (Aarti Balaji Rudrawar) (वय 30 वर्ष) असे या या दाम्पत्यातील पती-पत्नीचे नाव आहे. हे दाम्पत्य नोकरिच्या निमित्ताने अमेरिकेत राहात होते. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील अर्लिंग्टन प्रदेशात कुटुंबासह स्थायिक झाले होते. बालाजी रुद्रावतार हे अंबाजोगाई येथील मोठे आणि प्रसिद्ध व्यापारी भारत रुद्रावतार यांचे पूत्र होत. तो एका आयटी कंपनीसोबत काम करत होता. या कंपनीसोबत काम करता करता तो अमेरिकेतील न्यू जर्सी येथे स्थाईक झाला होता.

बालाजी आणि आरती यांच्या मृत्यूबद्दल सुरवातीला कोणालाच माहिती नव्हते. परंतू, विहा नावाची त्यांची चार वर्षांची मुलगी घराच्या गॅलरीत खूप वेळ रडत होती. मुलीला बराच वेळ रडताना पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर आरती आणि बालाजी यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना आढळले. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडत तेथील पोलिसांनी फोन करुन भारत रुद्रवार यांना गुरुवारी (8 एप्रिल) सकाळी नऊ वाजता या दाम्पत्याच्या मृत्यूबाबत माहिती दिली. या घटनेमुळे रुद्रवार कुटुंबीय मानसिक ताणामध्ये आहेत.

रुद्रवार कुटुंबीय हे अंबाजोगई येथे स्थायिक आहेत. येथे त्यांचा मोठा व्यापार आहे. रुद्रवार कुटुंबातील अनेक सदस्य नोकरी, व्यापार अशा कारणांनी अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या अशा संशयास्पद मृत्युमुळे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. बालाजी आणि आरती यांचा मृत्यू ही हत्या आहे की आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू हे शवविच्छेदनानंतरच कळणार आहे.