Ambadas Danve: अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात? मनिषा कायंदे शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे गटाला हादरा?
कायंदे यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पदावर दावा सांगणार का? याबाबत उत्सुकता आहे.
मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांच्या रुपात ठाकरे गटाचा विधान परिषदेतील पहिला महिला आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde Group) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गळाला लागला आहे. त्यामुळे आतपर्यंत विधान परिषदेत एकही सदस्य नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद किंचीत वाढली आहे. मात्र, शिंदे यांच्या वाढलेल्या अल्प ताकतीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मात्र जोरदार हादरा बसण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे विरोधी पक्ष नेतेपद अडचणीत येण्याची शक्यता आहे. कायंदे यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पदावर दावा सांगणार का? याबाबत उत्सुकता आहे.
मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेशकरताच त्यांना मोठी लॉटरी लागली आहे. कायंदे यांच्यावर पक्षाने थेट सचिव पदाचीच जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील इतर काही महिला नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या तर नवल वाटायला नको. दरम्यान, आगोदर विप्लव बजौरिया आणि आता मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद विधानपरिषदेत समसमान झाली आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसने ही खेळी केली तर मात्र ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. (हेही वाचा, Manisha Kayande Joins Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मनीषा कायंदे यांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला धक्का)
विधानपरिषदेतील संख्याबळ
(मनिषा कायंदे यांच्या पक्षांतरानंतर)
भाजप : 22
ठाकरे गट : 09
शिवसेना : 02
राष्ट्रवादी काँग्रेस : 09
काँग्रेस : 08
विधानपरिषदेतील पक्षीय बलाबलीवर नजर टाकता लक्षात येते की, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संख्याबळ सारखेच आहे. असे असले तरी सत्तेचे सूत्र विचारात घेता ठाकरे गटाच्या निलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी विरोधी पक्षनेतेपद आणि उपसभापतीपद दोन्ही ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून या पदासाठी मागणी होऊ शकते. दुसऱ्या बाजूला काँग्रेसही सत्तेत वाटा मागू शकते. कारण, महाविकासआघाडीच्या रुपात पाहायचे तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे आहे. विधापरिषदेचे उपसभापती पद निलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. त्यामुळे किमान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद तरी आपल्याकडे असावे, असे काँग्रेसला वाटू शकते. दरम्यान, मविआ यातून काय तोडगा काढते याबाबत उत्सुकता आहे.