125 Feet Long Banner: अजित पवार यांच्या समर्थकाने कमालच केली; जुन्नर तालुक्यात लावला तब्बल 125 फूट आकाराचाच बॅनर
या बॅनरवर तब्बल 6 हजार 500 समर्थकांचे फोटो छापण्यात आले आहेत.
प्रसिद्धी मिळावण्यासाठी कोणता व्यक्ती काय करेल, याचा काही नेम नाही. यातच पुण्यातील (Pune) जुन्नर (Junner) तालुक्यातील एका राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने तब्बल 125 फूट आकाराचा भव्यदिव्य बॅनर रस्त्याच्याकडेला झळकवला आहे. महत्वाचे म्हणजे, या बॅनरवर तब्बल 6 हजार 500 समर्थकांचे फोटो छापण्यात आले आहेत. यामुळे हा बॅनर अतिशय चर्चेचा विषय ठरत आहे. हा बॅनर पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. याआधीही पुण्यातील नागरिकांनी प्रसिद्धीसाठी अनेक नवे ट्रेंड सेट केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचे आहे. त्याने या फ्लेक्सवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही फोटो छापला आहे. त्यावरुन हा कार्यकर्ता अजित पवार यांचा समर्थक असल्याचे दिसत आहे. राजकारणात प्रसिध्दीसाठी कोण काय करेल याची शाश्वती नाही. जुन्नरमधील हा बॅनरबाजीचा प्रकारही राजकीय प्रसिद्धीचाच स्टंट दिसतो आहे. तसेच आपले किती समर्थक आहेत? याचे प्रदर्शन करण्यासाठी देखील या कार्यकर्त्याने बॅनरबाजी केली असावी, असेही मत अनेकजण व्यक्त करत आहेत. हे देखील वाचा- Defaulter Bungalow Of Minister's In Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्याचे बंगले डिफॉल्टर यादीत, पाणीपट्टीही थकली
बॅनरबाजी हे पुणेकरांसाठी नवीन नाही. याआधी पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे बॅनर पाहायला मिळाले आहेत. त्यात बस स्टॉप चोरी, नगरसेवक गायब, प्रेयसीचे नाव लिहून प्रेमाची कबुली देणारे किंवा माफी मागणाऱ्या बॅनरचा समावेश आहे. यात अजित पवारांच्या समर्थकाने आणखी भर घातली आहे.
प्रसिद्धीच्या हव्यासापायी अनेकदा रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले हे बॅनर पडून रस्त्यावरील प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र, त्यानंतरही राजकीय आश्रय असलेल्या या बॅनरबाजीवर अंकुश आलेला नाही. आता या बॅनरची वाहतुकीच्या दृष्टीने तपासणी होऊन कारवाई होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.