उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांच्याच नावावर होणार का शिक्कामोर्तब? वाचा सविस्तर
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आता काही दिवस उलटले आहेत. तरीही उपमुख्यमंत्री पद तसेच इतर मंत्रालयीन खाती कोणाकडे जाणार याचे अद्यापही वाटप झालेले नाही. हा उपमुख्यमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार याविषयी अजून महाराष्ट्र विकास आघाडीतील कोणत्याही नेत्याकडून काहीही अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली नाही.
मात्र सरकारी पातळीवरील काही हालचालींकडे पाहिल्यावर असे संकेत मिळत आहेत की अजित पवारच महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. कारण शासनाकडून नुकतेच दालन वाटप करण्यात आले असले तरीही मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील सहाव्या मजल्यावरील मुख्य इमारतीतील मोठे दालन अद्यापपर्यंत कुणालाही देण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे नव्याने शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांपैकी एकालाही हे दालन दिलेलं नाही. त्यामुळे हे दालन अजित पवार यांच्यासाठी राखून ठेवले आहे का असा प्रश्न समोर येतो.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उपमुख्यमंत्री होण्याची जास्त शक्यता असल्याने, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि अजित पवार ही तीन नावे आघाडीवर आहेत. त्यातील अजित पवार यांचा समर्थक मोठा गट असल्याने त्यांनाच उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव देखील असून शकतो.
या सर्व घडामोडींकडे बघता राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही.