Kartiki Ekadashi 2023: विठ्ठला.. कोण करणार पूजा? अजित पवार की देवेंद्र फडणवीस? कार्तिकी एकादशी शासकीय पूजेवरुन मंदिर समितीपुढे पेच

तर उपमुख्यमंत्री हे कार्तिक एकादशी निमित्त पूजा करतात. मात्र, राज्याच्या इतिहासात प्रथमच राज्याला दोन मुख्यमंत्री लाभल्याने आता कार्तिकी एकादशी पूजा कोणाच्या हस्ते करायची? हा पेच मंदिर समितीसमोर उभा ठाकला आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar (PC - Facebook)

Vitthal Rukmini Government Mahapuja Pandharpur: 'विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती' या गाण्यातील ओळींप्रमाणे अशी वेळ प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यावर कधीतरी येतेच. महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय स्थितत तर नक्कीच. पण, आता ही वेळ चक्क पंढरपुरातील श्री विठ्ठल समितीवर देखील आली आहे. निमित्त ठरले आहे, महाराष्ट्रात तयार झालेली दोन उपमुख्यमंत्री पदं. शासकीय नियम आणि संकेतानुसार राज्याचे मुख्यमंत्री आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा करतात. तर उपमुख्यमंत्री हे कार्तिक एकादशी निमित्त पूजा करतात. मात्र, राज्याच्या इतिहासात प्रथमच राज्याला दोन मुख्यमंत्री लाभल्याने आता कार्तिकी एकादशी पूजा कोणाच्या हस्ते करायची? हा पेच मंदिर समितीसमोर उभा ठाकला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अजित पवार या दोघांपैकी नेमकी कोणाच्या हस्ते कार्तिकी एकादशी पुजा घ्यावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याने मंदिर समितीने आता थेट विधी विभागाचा सल्ला घ्यायचे ठरवले आहे. यांदाच्या वर्षी कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी येत आहे. त्याच्या तयारीसाठी मंदिर समितीची एक बैठक काल पार पडली. या बैठकीत शासकीय पूजा कोणाच्या हस्ते घ्यावी, याबातब बराच खल झाला. मात्र, तोडगा न निघाल्याने समितीने राज्याच्या विधी विभागाचा सल्ला घ्यायचे ठरवले आहे.

कार्तिकी एकादशी निमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजा मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या सोबत करावी असा प्रघात आहे. मात्र, आता प्रघातामध्येच सवता सुभा निर्माण होऊ पाहात असल्याने समितीसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, या समितीला निर्णय घेण्याचाच अधिकार आहे किंवा नाही याबातब मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्याचे कारण असे की, समितीच्या कार्यकाळाची मूदत संपून आता अडीच वर्षे लोटली आहेत. तरीही अद्यापही नवी समिती स्थापन करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, कोणालाही दुखावायला नको म्हणून समितीने कोणताही निर्णय घेतला नाही. त्याउलट, शासकीय पूजा कोणाच्या हस्ते घ्यावी याबाबत विधी विभागानेच सल्ला द्यावा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.