Mumbai, Pune Air Quality: हुश्श्य! मुंबई, पुणे शहरातील वायू प्रदूषणावर पावसाचा उतारा, हवेची गुणवत्ता पातळी सुधारली

त्या प्रयत्नांनाही चांगले यश आल्याचे दिसते आहे. ताज्या माहितीनुसार मुंबई आणि पुणे शहरातील हवेची गुणवत्ता पातळी अनुक्रमे 94 आणि 82 इतकी आहे.

Air Pollution | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai, Pune News: वायू प्रदूषण आणि ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे श्वसनविकार आणि आरोग्यविषयी समस्यांचा सामना करणाऱ्या मुंबई, पुणे शहरातील (Mumbai, Pune Air Quality) नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारली आहे. दोन्ही शहरांमध्ये काल (9 नोव्हेंबर) रात्री हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. ज्यामुळे शहरांतील वायू प्रदूषणामुळे घसरलेल्या हवेच्या गुणवत्तेवर उतारा मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंंबई महापालिका आणि पुणे महापालिका प्रयत्नशील होते. त्या प्रयत्नांनाही चांगले यश आल्याचे दिसते आहे. ताज्या माहितीनुसार मुंबई आणि पुणे शहरातील हवेची गुणवत्ता पातळी अनुक्रमे 94 आणि 82 इतकी आहे.

महापालिका आणि प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करुनही मुंबई, पुणे शहरातील हवा गुणवत्ता पातळी मॉडरेट श्रेणीमध्येच होती. परिणामी नागरिकांना श्वसनविकार आणि आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दरम्यान, प्रशासनाने दावा केला आहे की, हवेची गुणवत्ता पातळी सुधारण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येते आहे. पुढच्या 48 तासांमध्ये मुंबईतील हवेच्या गुणवत्ता पातळीत बऱ्यापैकी फरक जाणवू शकेल. त्यात सुधारणा झाल्याचेही पाहायला मिळू शकते.

Mumbai AQI: मुंबई शहर आणि उपनगरांतील हवा गुणवत्ता निर्देशांक

भांडूप- 85, कुलाबा- 66, मालाड- 73, माझगाव-103, वरळी-53, बोरवली-99, बीकेसी-127, चेंबूर-73, अंधेरी-75, नवी मुंबई-102

Pune AQI: पुणे आणि उपनगरातील हवा गुणवत्ता निर्देशांक

पाषाण-43, शिवाजीनगर- 127, लोहगाव- 83, कात्रज- 46, हडपसर- 113, भोसरी- 79, निगडी- 89, भुमकर चौक- 89, कौथरुड- 95

Maharashtra Citys AQI: महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक

अकोला- 123, अमरावती- 134, छत्रपती संभाजीनगर- 133, भिवंडी- 56, चंद्रपूर- 156, धुळे- 173, जळगाव- 130, जालना- 130, कल्याण- 86, कोल्हापूर- 104, लातूर- 97, मिरा भाईंदर- 88, नागपूर- 180, उल्हासनगर- 85, नाशिक- 102, सोलापूर- 55

राज्याच्या राजधानीचे आणि आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईचा श्वास वायूप्रदूषणामुळे पाठिमागील काही दिवसांपासून कोंडला आहे. दरम्यान, पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या सरी काल रात्री कोसळल्या. खास करुन घाटकोपर, विक्रोळी, भांडुप , मुलुंड, गोवंडी भागात बऱ्यापैकी पाऊसधारा कोसळल्या. ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. वातावरणातही थंडावा पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला वातावरणातील धुळ खाली बसल्याने हवेची गुणवत्ताही सुधारण्यास मदत झाली.