Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर येथील ICU मध्ये लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू; महिला वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिकांना अटक

या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. त्याचवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

Arrest (Photo Credits: File Image)

राज्यातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील (ICU) आगीत (Fire) कोविड-19 च्या 11 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांनी जिल्हा पोलिसांकडून, महिला वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिकांवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवत त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली. अहमदनगर (ग्रामीण क्षेत्र) पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ विशाखा शिंदे आणि परिचारिका सपना पाथरे, आसमा शेख आणि चन्ना अनंत यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, डॉ. विशाखा शिंदे 6 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात ड्युटीवर होत्या, परंतु त्या घटनेची तक्रार नोंदवण्यास अयशस्वी ठरल्या. तिन्ही परिचारिकांबद्दल बोलायचे झाले तर, आग लागली तेव्हा त्या आयसीयूबाहेर होत्या, असे तपासात समोर आले आहे. पाटील म्हणाले की, आयसीयूमध्ये आग लागल्यास रुग्णांचे संरक्षण करणे ही नर्सची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र इथे रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी आयसीयूकडे धाव घेतली, तर या परिचारिका बाहेर वाट पाहत उभ्या होत्या.

आग लागली तेव्हा आयसीयू वॉर्डमध्ये एकूण 20 रुग्णांवर उपचार सुरू होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर परिचारिका, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रूग्णांना रूग्णालयात हलविले जाऊ लागले. मात्र या सगळ्यात 11 रुग्णांचा मृत्यू झाला अटक करण्यात आलेल्यांपैकी विशाखा शिंदे, सपना पठारे यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलंय. तर आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आलीय.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. त्याचवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. या घटनेची चौकशी करून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश डीसींना देण्यात आले आहेत. (हेही वाचा: Ahmednagar District Hospital Fire: अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणी 3 अधिकारी निलंबित, 2 परिचारिका बडतर्फ)

दरम्यान, महाराष्ट्रातील रूग्णालयांना आग लागण्याच्या घटनांमध्ये पूर्वी खूप वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागली होती, त्यात 10 नवजात बालकांना जीव गमवावा लागला होता. महाराष्ट्र सरकारने या घटनेनंतर लगेचच लेखापरीक्षण समिती स्थापन केली होती