Navi Mumbai Civic Polls: आमदार आशिष शेलार यांच्यावर BJP कडून आणखी एक जबाबदारी, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती
Ashish Shelar (PC - PTI)

महाराष्ट्रामध्ये कोविड 19 संकटामुळे अनेक महानगरपालिकांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. पण हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना आता फेब्रुवारी 2021 मध्ये या निवडणूकांचे पडघम वाजायला सुरूवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपाने आता तयारीला सुरूवात केली आहे. नवी मुंबई महानगरपलिका निवडणूका (Navi Mumbai Civic Polls) होणार आहेत. लवकरच बिगुल वाजू शकते. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आता मिशन नवी मुंबई सुरू झाले आहे. या निवडणूकीसाठी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर निवडणूकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. Municipal Corporation Election 2021 in Maharashtra: नव्या वर्षात महाविकासआघाडी विरुद्ध भाजप रंगणार सामना; नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबादसह 'या' 5 ठिकाणी पार पडतील महानगरपालिका निवडणुका.

दरम्यान भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईत विधानसभा निवडणूकीत पक्षाला मोक्याच्या जागा निवडून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यापाठोपाठ गुजरात, कर्नाटक सह नुकतेच हैदराबाद महापालिका निवडणुकीत सहप्रभारी म्हणून काम केले आहे. परिणामी आत्मविश्वास दुणावलेल्या आणि पक्षाला यश मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील अशा आमदार अँड आशिष शेलार यांच्यावर भाजपाकडून आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे.

येत्या काही दिवसात नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका पार पडतील. उमेदवार निवडण्यापासून ते निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातील उमेदवारांना भाजपत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यावरही भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये चर्चा झाली आहे. आता महाविकास आघाडीला मात देण्यासाठी भाजपा स्वबळावर ही निवडणूक लढणार की इतर पक्षांसोबत युती करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

2015 साली राष्ट्रावादी कॉंग्रेस आणि इतर पक्षांकडे सर्वाधिक नगर सेवक होते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणि दरम्यानच्या काळात अनेकांनी पक्षांतर केल्याने आता भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे आता निवडणूकीच्या रणनीतीबाबत सारेच पक्ष कामाला लागले आहेत.