Election Commission delists 'Tutari', 'Bigul': 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या लढ्याला यश; निवडणूक आयोगाने गोठवली 'तुतारी' आणि 'बिगुल' मुक्तचिन्ह
'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या X अकाऊंटवरून माहिती देताना निवडणूक आयोगाने 'तुतारी' आणि 'बिगुल' मुक्तचिन्ह गोठवली असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात एनसीपी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाचे नाव आणि चिन्हं गमवलं. त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणूकांसाठी त्यांनी 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्हं घेतलं मात्र मतदार यंत्रावर अपक्ष उमेदवारांना या चिन्हाशी साधर्म्य असणारी अन्य दोन चिन्हं होती त्यामुळे काही ठिकाणी शरद पवारांना लोकसभेत फटका बसला. पण हा फटका विधानसभा निवडणूकीमध्ये बसू नये म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाचे याकडे लक्ष वेधले होते आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे.
'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या X अकाऊंटवरून माहिती देताना
निवडणूक आयोगाने 'तुतारी' आणि 'बिगुल' मुक्तचिन्ह गोठवली असल्याचं म्हटलं आहे.
'पिपाणी', 'बिगुल' ह्या चिन्हाचा 'तुतारी' असा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न झाला त्याविरोधात 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या लढ्याला यश आल्याचं त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता मतदान यंत्रांवर 'तुतारी वाजवणारा माणूस' हेच चिन्ह दिसणार आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये सातारा मध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली. त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 5 लाख 38 हजार 363 मतं पडली. म्हणजेच शिंदे यांचा 32 हजार 771 मतं कमी पडली. दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली होती. बीड मध्येही पिपाणी हे चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे चिन्हावरून होणारा हा घोळ टाळण्यासाठी शरद पवारांनी दाद मागितली होती.
लोकसभा निवडणूकीमध्ये शरद पवारांना मिळालेल्या यशानंतर आता त्यांच्या विश्वास दुणावला आहे. विधानसभेमध्ये हा फटका टाळण्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याला यश आलं आहे.