Pune Murder Case: कर्जदारांपासून सुटका मिळण्यासाठी स्वत: च्या मृत्यूचं नाटक रचून आरोपीने केली मित्राची हत्या; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
कर्जदारांपासून सुटका करण्यासाठी पुण्यातील एका व्यक्तीने स्वतःची हत्या केल्याचं नाटक केलं. एवढेचं नव्हे तर त्याने आपल्याच मित्राचीही हत्या केली.
Pune Murder Case: पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या खुनाचे प्रकरण उघडकीस आणले आहे. कर्जदारांपासून सुटका करण्यासाठी पुण्यातील एका व्यक्तीने स्वतःची हत्या केल्याचं नाटक केलं. एवढेचं नव्हे तर त्याने आपल्याच मित्राचीही हत्या केली. आत तक या हिंदी चॅनलसोबत बोलताना पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, पोलिस अधिकाऱ्यांनी 21 दिवसांच्या आत खून प्रकरणातील अत्यंत कठीण प्रकरण सोडवले आणि खून करणाऱ्या आरोपीला तुरूंगात पाठवले. 29 नोव्हेंबरला हिजवाडी पोलिस ठाण्यातील बुधनशहा दर्गातील मौलानाचा फोन आला. त्यांनी पोलिसांना कुजलेल्या बेवारस मृतदेहाची माहिती दिली.
पुणे शहरातील बाणेर भागात मुंबई बंगळुरू हायवेला लागून असलेल्या दर्ग्यामागील शेतात पोलिसांनी अडीच फूटाच्या खड्ड्यातून अर्ध जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. तपासणी दरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून एक पाकीट, एक ब्लूटूथ आणि काही जळलेले कपडे सापडले. पाकीटातील चिठ्ठीवर दोन मोबाइल नंबर लिहिलेले आढळले. पोलिस अधिका-याने अहवालात म्हटले आहे की, मृत व्यक्तीच्या शरीरावर एकाहून अधिक वार करण्यात आले आणि नंतर मृतदेह जाळण्यात आला. अत्यंत वाईट प्रकारे जळलेल्या आणि कुजलेल्या प्रेतामुळे चेहरा ओळखण कठीण झालं. ज्यामुळे पोलिसांना तपास करणदेखील अधिक किचकट झालं. (हेही वाचा -Maharashtra: शिर्डीत नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडा, 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल)
मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिठ्ठीतील मोबाइल नंबरच्या आधारे तपास अधिकारी श्री. बालकृष्ण सावंत आणि त्याचा साथीदार सागर कांटे यांनी तपास सुरू केला. त्यांनी या दोन मोबाइल क्रमांकावर कॉल करण्यास सुरुवात केली. यातील एक नंबर स्विच ऑफ होता. त्यानंतर मोबाईल सुरू असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ठाण्यात बोलावण्यात आले. दरम्यान, दुसरीकडे पोलिसांनी हरवलेल्या लोकांच्या घरातील पत्ते काढून तेथे पोलिस पथक पाठवले. 1 डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात बोलवण्यात आलेल्या व्यक्तीला विचारपूस केली असता अशी माहिती समोर आली की, एका व्यक्तीने त्याच्याकडे आपला मोबाईल नंबर मागितला होता. ती व्यक्ती पिंपरी-चिंचवड परिसरातील व्हाइस सीएम हॉस्पिटलसमोर बसलेली भिखारी असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी पिंपरी-चिंचवड वायसीएम रुग्णालयासमोर बसणाऱ्या काही भिकाऱ्यांची चौकशी केली. गेटजवळ बसलेल्या काही लोकांनी सांगितले की, त्याचे नाव संदीप मानकर, वय 45 आहे. तो गेल्या काही दिवसांपासून गेटजवळ आला नाही.
हिजेवाडी पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांनी व्हाईस सीएम हॉस्पिटलच्या सभोवतालच्या सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले. यात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये 45 वर्षीय व्यक्ती एका दुसर्या व्यक्तीसोबत चालताना दिसला. तसेच 25 नोव्हेंबरला संदीप मेनकर जवळच्या शिव साई रेस्टॉरंटमध्ये जेवणाची प्लेट विकत घेताना दिसला. त्याच व्यक्तीसह मोटरसायकलवर बसूनही ही व्यक्ती सलग दोन ते तीन दिवस दुसर्या व्यक्तीबरोबर दिसली.
त्यानंतर पोलिसांना खात्री पटली की, या दोन व्यक्तींपैकी एकाने दुसर्याची हत्या केली आहे. मात्र, हत्या करण्यात आलेली व्यक्ती नेमकी कोण आहे, हे कोडे पोलिसांसमोर होते. पुण्याच्या वाकड भागात राहणारा दुसरा व्यक्ती 52 वर्षांचा मेहबूब शेख होता. जेव्हा पोलिसांनी त्याच्या घरच्यांची चौकशी केली, तेव्हा घरच्यांनी पोलिसांना मेहबूबवर कर्ज असणाऱ्या 7 ते 8 जणांची नावे असणारी चिठ्ठी दिली. मेहबूबच्या जीवाचे बरेवाईट झाले तर यास कर्जदार लोक जबाबदार असतील, असेही त्याने या चिठ्ठीत म्हटलं होतं. यानंतर पोलिसांनी मेहबूबच्या घरच्या व्यक्तींना अर्धे जळलेले कपडे आणि ब्लूटूथ दाखवले. हे कपडे मेहबूब शेखचे असल्याचं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं. यासह मेहबूबच्या घराच्यांनी कर्जदार व्यक्ती मेहबूबच्या मृत्यूला जबाबदार असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करा, अशी मागणी केली.
मेहबूबच्या मृत्यूमुळे त्याच्या घरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर थोडही दु:ख नव्हतं. यावरून पोलिसांना शंका आली आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. मेहबूबचा फोन काही दिवसांनी सुरू झाला. त्यानुसार, पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले. त्यानंतर पोलिसांनी दौंड पोलिस स्टेशनवर मेहबूबला अटक केली. मेहबूबला अटक करुन पुण्यात आणण्यात आले. चौकशी दरम्यान, मेहबूबने आपला गुन्हा कबूल केला आणि सर्व घटना स्पष्टपणे सांगितली. कर्ज फेडण्यास असक्षम असल्याने त्याने स्वतःला मारण्याचे नाटक केले आणि त्याच्या मित्राचा खून केला. या मित्राला कुटुंब नव्हते, तो रस्त्यावर बसून भीक मागत असे. मेहबूबने या मित्राला पुण्यातील बाणेर भागात नेऊन जिवंत मारलं.