Abdul Sattar Controversy: अब्दुल सत्तार पुन्हा वादात; पाच जणांवर गुन्हा दाखल, सिल्लोड येथील घटना

सोबतच, सामाजिक कार्यकर्त्यावरही गुन्हा दाखल झाल्याचे समजते. महेश शंकरपेल्ली असे सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत.

Abdul Sattar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Sillod Police News: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या पीए आणि काही समर्थकांनी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी केल्याचे वृत्त आहे. शिवाय त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समजते. सिल्लोड पोलिसांनी या प्रकरणी पीए आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सोबतच, सामाजिक कार्यकर्त्यावरही गुन्हा दाखल झाल्याचे समजते. महेश शंकरपेल्ली असे सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत.

काय आहे प्रकरण?

सिल्लोड शहरातील सर्वे क्रमांक 92 मध्ये काही आक्षेपार्ह फेरबदल झाल्याची तक्रा होती. या तक्रारीची तलाठी भवन येथे सुनावणी होती. सुनावणी संपल्यावर सामाजिक कार्यकर्ते शंकरपल्ली यांना अब्दुल सत्तार यांचे पीए बबलू चाऊस आणि त्यांच्या सोबतच्या टोळक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या वेळी चाऊस याच्यासोबत शाकीर मिया जानी आणि बबलू पठाण आणि काही जण होते असा आरोप आहे. दरम्यान, शंकरपल्ली यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याने त्यांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. शकरपल्ली यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, महेश शंकरपेल्ली यांच्या हवाल्याने एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, अब्दुल सत्तार यांचे पीए आणि काही समर्थकांनी तहसील कार्यालय परिसरात त्यांना (शंकरपेल्ली) मारहाण केली. सत्तार आणि त्यांच्या समर्थकांकडून पाठिमागील दोन वर्षांपासून आपण आणि आपल्या कुटुंबीयांसह मालमत्तेला धोका आहे. याबाबत शासनदरबारी आपण अनेक वेळा तक्रारी दिल्या आहेत. त्यातच आता हे प्रकरण घडले आहे. त्यामुळे सरकारने घटनेची वेळीच दखल घेत मला व कुटुंबीयांना तातडीने सुरक्षा द्यावी. शिवाय आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी त्यांनी शंकरपेल्ली यांनी केली आहे.