Aastha Special Trains: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते CSMT-Ayodhya Dham आस्था ट्रेनला हिरवा कंदिल; राज्यभरातील भाविकांना घडवणार रामलल्लांचं दर्शन
खासदार धनंजय महाडिक यांनी 5 हजार भाविकांना अवघ्या 1 हजार रूपयांमध्ये अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घडवणार असल्याची घोषणा केली आहे.
अयोध्येचं श्रीराम मंदिर भाविकांसाठी खुलं झाल्यानंतर आता अनेक रामभक्तांना रामलल्लांचं दर्शन घेण्याची ओढ लागली आहे. भाजपा ने अनेक निवडणूकांमध्ये 'मंदिर वही बनाएंगे' च्या घोषणा दिल्या होत्या. आता मंदिर उभारणीचं काम झाल्यानंतर सहाजिकच त्यांच्याकडून देशभरातील रामभक्तांना त्याचं दर्शन घडवण्याची तयारी सुरू झाली आहे. काल मुंबई ते अयोद्धा धाम विशेष आस्था ट्रेनला (Aastha Special Trains) देखील हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सीएसएमटी स्टेशन वर त्यासाठी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन अयोध्या आखलेलं आहे. त्यानुसार आता हे दर्शन घडवलं जात आहे.
मुंबई ते अयोध्या धाम हा 35 तासांचा प्रवास आहे. 1400 रामभक्त एका गाडीतून प्रवास करू शकणार आहेत. सध्या राज्याच्या कानाकोपर्यामधून 22 विशेष आस्था ट्रेन सोडल्या जाणार आहेत. 7 मार्च पर्यंत रामभक्तांना रामलल्लांचं दर्शन घडवून पुन्हा परत आणण्याचे आयोजन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी 5 हजार भाविकांना अवघ्या 1 हजार रूपयांमध्ये अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घडवणार असल्याची घोषणा केली आहे. या हजार रुपयांमध्ये प्रवास, जेवण, राहणे, दर्शन, रेल्वेतील जेवण असा सर्व खर्च करण्यात येणार आहे. 13 फेब्रुवारीला रात्री कोल्हापूरातून अयोध्येला ट्रेन जाणार आहे. त्यासाठी नोंदणीचं त्यांनी आवाहन केले आहे.