आदित्य ठाकरे यांच्यासह मुंंबईतील 'या' आमदारांच्या गळ्यात पडू शकते मंत्रिपदाची माळ

मुंबईचं प्रतिनिधित्त्व करणारे अदित्य ठाकरे, आशिष शेलार, रविंद्र वायकर, मंगलप्रभात लोढा यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते.

Aaditya Thackeray | File Image

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 24 ऑक्टोबर दिवशी जाहीर करण्यात आला आहे. मतदारांनीही पुन्हा भाजपा-शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे सद्य राजकीय स्थिती आणि संख्याबळ पाहता महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना- भाजपा युती सरकार स्थापन करू शकेल अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक शिवसेना आणि भाजपा आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेवर झेंडा रोवण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगर विधानसभा मतदार संघ जिंकणं फार महत्त्वाचे होते. त्यामुळे शिवसेना भाजपा युतीच्या मुंबईतील काही आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहा महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रीमंडळामध्ये कोनाकोणाच्या गळ्यात पडू शकते मंत्रीपदाची माळ?

मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये वरळी, दादर हे शिवसेनेचे मतदार संघ त्यांना राखण्यात यश आलं आहे. तर भाजपाने त्यांचे पारंपारिक आणि हमखास यशाचे वांद्रे पश्चिम, बोरिवली, घाटकोपर, कुलाबा येथील विधानसभा मतदारसंघ जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईचं प्रतिनिधित्त्व करणारे अदित्य ठाकरे, आशिष शेलार, रविंद्र वायकर, मंगलप्रभात लोढा यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. भाजप-शिवसेना महायुती ची 'ही' असू शकते संभावित मंत्र्यांची यादी; पाहा कोणाला मिळू शकतं कोणतं खातं?

आदित्य ठाकरे

शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आता आमदार झाले आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असलेला आदित्य ठाकरे तसा विधीमंडळाच्या कामकाजामध्ये नवखा आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तरी एखाद्या महत्त्वाच्या खात्याचा भार आदित्यकडे दिला जाऊ शकतो.

आशिष शेलार

आशिष शेलार हे भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आहेत. मागील सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तारामध्ये त्यांना शालेय शिक्षण खात्याचा भार देण्यात आला होता. आता नव्या सरकारमध्ये त्याचं प्रमोशन होतंय का? हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

रविंद्र वायकर

शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांनी यंदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यंदा हॅट्रीक केली आहे. त्यांनी मागील सरकारमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सोबत राज्य गृहनिर्माण मंत्रीपद, उच्च शिक्षण मंत्रीपददेखील निभावलं आहे. नव्या सरकारमध्ये त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.

मंगलप्रभात लोढा

सर्वात श्रीमंत आमदार अशी ओळख असणार्‍या मंगलप्रभात लोढा यांनादेखील नव्या सरकारमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन आता आठवडा उलटेल. सध्या सत्ता स्थापनेसाठी संघर्ष पेटला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा नेमक्या कोणत्या पदांवरून वाटाघाटी करणार हे पहावं लागणार आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 145 हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे नवं सरकार स्थापन करण्यासाठी कोण आणि कसा दावा करतोय याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.