Vedanta-Foxconn Project: उद्योगमंत्र्यांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा नेण्यापूर्वी Aaditya Thackeray यांचा ट्वीट द्वारा निशाणा; '15 जुलैला बैठक झाली होती, तरीही प्रकल्प बाहेर गेला'
सध्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी Vedanta-Foxconn Project वर केवळ चर्चा झाली होती लेखी कारवाई कुठेही झाली नसल्याचं सांगत योग्य पाठपुरावा न झाल्याने वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्राने गमावल्याचं म्हटलं आहे.
शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या निष्ठा यात्रेचा आजपासून तिसरा टप्पा सुरू होत आहे. यावेळेस ते कोकण दौर्यावर आहेत. सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत देखील रत्नागिरीचे आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने उदय सामंतही टीकेचे धनी बनले आहेत. आदित्य ठाकरेंनी आज सकाळी ट्वीट करत महाराष्ट्राच्या वाट्याचा प्रकल्प गुजरात गेल्यावरून सत्ताधार्यांना लक्ष्य करत असताना शिंदे फडणवीस सरकारच्या बैठका झाल्या तरीही प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या ट्वीट मध्ये सरकारची 15 जुलैला सेमिकंडक्टरच्या प्रकल्पासाठी एक उच्च स्तरीय समितीसोबत बैठक झाली त्यामध्ये सोयी-सुविधांची चर्चा झाली. त्यानंतर 25-26 जुलैला विधिमंडळात दावा झाला, मीडीयाला वेदांताचा प्रकल्प राज्यात येणार असल्याची माहिती दिली मग तरीही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला यामधून लाखभर रोजगाराच्या संधी गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
युवासेनेकडून सध्या महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे प्रकल्प गमावल्याने बेरोजगारी वाढवल्याचं सांगत उदय सामंत यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे.
आदित्य ठाकरे यांचे ट्वीट
दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाची चर्चा झाली. एमओयू झाला, जागा देण्यात आली असा दावा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंनीही तशीच माहिती दिली. पण उदय सामंत यांनी ही केवळ चर्चा झाली होती लेखी कारवाई कुठेही झाली नसल्याचं सांगत योग्य पाठपुरावा न झाल्याने वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्राने गमावल्याचं म्हटलं आहे. आता मुख्य प्रकल्प नसला तरीही संलग्न प्रकल्प आपण राज्यात आणण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले आहेत.