अहो आश्चर्यम ! पुण्यातील महिलेने 50 हजारात चक्क चंद्रावर घेतली एक एकर जमीन

तेही 2005 साली, चक्क 1 एकर आणि फक्त 50 हजारांत.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सध्या सोने अथवा जमीन हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानले जातात. जसे जमेल तसे सुजाण लोक शहरापासून दूर, थोड्या मोकळ्या ठिकाणी जागा घेऊन ठेवतात. पुढे मागे उपयोगी पडेल अथवा आपणच तिथे राहू असा त्यामागचा उद्देश असतो. मात्र पुण्या (Pune) तील एका अतिसुजाण महिलेने याच्याही पुढचा विचार करून चक्क चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. तेही 2005 साली, चक्क 1 एकर आणि फक्त 50 हजारांत. मात्र आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येण्यासाठी या महिलेला तब्बल 13 वर्षांचा कालावधी लागला आहे. आता याबाबत कोणाकडे तक्रार करायची याबाबत ती साशंक आहे.

राधिका दाते- वाईकर असे हा महिलेचे नाव आहे. पंजाब येथील एका व्यक्तीने लुनार फेडरेशन (Lunar Federation) च्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी राधिका यांनी सीएनएन (CNN) वृत्तवाहिनीवर पाहिली. त्यानंतर तुम्हालाही अशी जागा घ्यायची असल्यास आमच्याशी संपर्क साधा अशी जाहिरात दाखवण्यात आली. या जाहिरातीद्वारे चंद्रावर एक सोसायटी उभी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी राधिका यांनीही ताबडतोब संबंधीत व्यक्तीकडे 50 हजार रुपये भरून 1 एकर जागा खरेदी केली. त्यासंदर्भातील खोटी कागदपत्रे, जागेचा नकाशा, तिकडचे कायदे, नियम यांची कागदपत्रे राधिका यांना पाठवण्यात आली. या सर्वात राधिका यांच्या पतीनेही त्यांना साथ दिली. जागा विकत घेतल्यानंतर 10 वर्षांनी तुम्हाला एक विशेष ट्रेनिंग देण्यात येईल, त्यानंतर चंद्रावर घेऊन जाऊ असेही सांगण्यात आले होते. मात्र इतक्या वर्षानंतर त्यांनी ती कागदपत्रे पुन्हा पाहिल्यावर ती खोटी असल्याची त्यांच्या लक्षात आले. (हेही वाचा : चंद्राच्या अंधाऱ्या भागावर चीनने उतरवले यान; रचला नवा इतिहास)

आता त्यांचा मुलगा कनिष्ट महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याच्या शिक्षणासाठी त्यांना पैश्यांची गरज आहे. मात्र या संदर्भात कुठे आणि कशी तक्रार करायची याची त्यांना काही कल्पना नाही.  पैसे मिळावेत, यासाठी सहा महिन्यांपासून अर्ज करीत आहे मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही, असे राधिका यांनी सांगितले.