Modi Bakra in Sangli: सांगली जिल्ह्यातील चोरी गेलेला 16 लाखांचा 'मोदी बोकड' सापडला; पोलिसांकडून 3 संशयित आरोपी ताब्यात
पोलिसांनी अवघ्या 24 तासात या बोकडाचा तपास लावला असून या प्रकरणी तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
Modi Bakra in Sangli: सांगली जिल्ह्यातील चोरी गेलेला 16 लाखांचा 'मोदी बोकड' (Modi Bakra) सापडला आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या बोकडाचा तपास लावला असून या प्रकरणी तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सांगलीतील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपयांचा मोदी बकरा आणि त्याचा वंश असलेल्या 16 लाखाचा बोकड गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर यातील 16 लाखांचा बोकड आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला होता. मात्र, शनिवारी जाधव यांचा हा मोदी बोकड चोरट्यांनी पळवून नेला. त्यामुळे संपूर्ण आटपाडी गावात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी केवळ चोवीस तासात चोरी गेलेल्या मोदी बोकडाचा शोध लावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी बोकड पळवण्यासाठी ज्या गाडीचा वापर केला होता. त्या गाडीच्या सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून संशयित आरोपींची चौकशी करण्यात आली. मात्र, सुरुवातीला या आरोपींनी चोरीचा आळ फेटाळला. परंतु, पोलिसांनी खोल तपास करत आरोपींकडून गुन्ह्याची कबुली करून घेतली. त्यावेळी आरोपींनी बोकड कराड येथील डोंगरावर नेहून ठेवला असल्याचं सांगितलं. (हेही वाचा - महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे यांनी रूळावर पडलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी लोकल समोर उडी मारत बजावलं कर्तव्य; पहा ग्रॅन्ट रोड स्थानकातील हा प्रसंग)
दरम्यान, पोलिसांनी आरोपींने दिलेल्या माहितीच्या आधारे बकऱ्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेत पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदा कोरोनामुळे ही यात्री रद्द झाली होती. मात्र, याठिकाणी रविवारी आणि सोमवारी जनावरांचा बाजार भरविण्यात येतो. मागच्या महिन्यात या बाजारात मोदी बोकड पाहायला मिळाले होते.